घरपालघरVasai News: सेल्सगर्ल बनून साथिदाराच्या मदतीने चोरी

Vasai News: सेल्सगर्ल बनून साथिदाराच्या मदतीने चोरी

Subscribe

या दुकानातील सर्व बारकावे तिने दोन महिन्यात जाणून घेतले. त्यानंतर अमृताने तिचा साथिदार विनोद मर्चंडे याच्या मदतीने पहिली यशस्वी चोरी केली.

वसईः वसईतील प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात सेल्सगर्लची नोकरी मिळवून आपल्या साथिदाराच्या मदतीने चोरी केल्याचे उजेडात आले आहे. बंटी-बबली पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली असली तरी त्यांचा दुसरा प्रयत्न फसल्याने दोघेही फरार झाले असून माणिकपूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वसईतील नायगाव येथील तनिष्क या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात बंटी-बबलीने गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यासाठी त्यांनी लढवलेल्या अनोख्या शक्कलीने पोलीसह चक्रावून गेले आहेत. अमृता सकपाळ (२६) या तरुणीने दुकानात सेल्सगर्लची नोकरी मिळवली. ५३ कर्मचारी आणि सुरक्षारक्षक असलेल्या या दुकानातील सर्व बारकावे तिने दोन महिन्यात जाणून घेतले. त्यानंतर अमृताने तिचा साथिदार विनोद मर्चंडे याच्या मदतीने पहिली यशस्वी चोरी केली.

ठरल्यानुसार ११ एप्रिलला विनोद मर्चंडे ग्राहक बनून जाऊन चैन विकत घेण्याचा बहाणा करत दुकानात आला. त्याठिकाणी अमृताकडे जाऊन स्वतःच्या गळ्यातील नकली चैन काढून देत अशाच पद्धतीची चैन पाहिजे असल्याचे सांगितले. अमृताने वेगवेगळ्या चैन दाखवण्यास सुरुवात केली. तेव्हा हातचलाखी करत विनोदने 1 लाख ७५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन गळ्यात घातली. काहीवेळ बहाणेबाजी केल्यानंतर चैन पसंत आली नाही, असे सांगत विनोद दुकानातून निघून गेला. बंटी-बबलीची चोरी यशस्वी झाली होती, असे वाटत असतानाच काही दिवसांतच विनोद दुकानात ठेऊन गेलेली चैन नकली असल्याचे उजेडात आले. एका ग्राहकाला ती नकली चैन पसंत पडल्यानंतर तपासणी केली गेली असता ती नकली असल्याचे आढळून आले. त्यामुळे नकली चैन दुकानात आलीच कशी याची शोध सुरु झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ११ एप्रिल २०२४ मधील विनोद आणि अमृताने केलेला चोरीचा हा अनोखा प्रकार समोर आला. मात्र, चोरी उघडकीस येऊन आपले पकडले जाऊ, असे दिसून आल्यावर अमृता नोकरी सोडून आपल्या साथिदारासह पसार झाली होती. याप्रकरणी तनिष्क ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन मौर्य यांच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी अमृता सकपाळ आणि विनोद मर्चंडे या दोघांविरोधात कलम ३८१, ३४ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मालाडच्या अप्पापाडा परिसरात राहणारे आहेत. दोघांनी संगनमत करून चोरीची योजना बनवली होती. त्यांना लवकरच अटक करू, असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -