घरपालघरअद्ययावत जिल्हा क्रीडा संकुल उभारणार, जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची माहिती

अद्ययावत जिल्हा क्रीडा संकुल उभारणार, जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची माहिती

Subscribe

दोन वर्षात परिपूर्ण क्रीडा संकुल कसे तयार होणार, याकडे लक्ष देऊन खेळाडूंसाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचेही जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी यावेळी सांगितले.

पालघर : पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना व क्रीडाप्रेमींना दोन वर्षांमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध होईल, अशी ग्वाही जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पालघर येथे क्रीडा शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण व नियोजन शिबिरादरम्यान दिली. जिल्हा क्रीडा संकुलासाठी १६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकुलासाठी आवश्यक निधी सुद्धा उपलब्ध झाला आहे. आपला जिल्हा सागरी, नागरी, डोंगरी या विभागात विभागला गेला आहे. इथे विविध खेळातील खेळाडू घडवण्यासाठी व त्यांना त्या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही बोडके यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे दोन वर्ष खेळांवरही निर्बंध लावण्यात आले होते. यावर्षी क्रीडा महोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात पार पडतील. आपल्या जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे प्राविण्य मिळवतील, याकडे लक्ष देण्यात येईल. दोन वर्षात परिपूर्ण क्रीडा संकुल कसे तयार होणार, याकडे लक्ष देऊन खेळाडूंसाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचेही जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुलाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. दोन ते तीन महिन्यात या संकुलांना मान्यता मिळणार आहे. त्याचप्रमाणे या वर्षापासून पालघर जिल्हा क्रीडा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रथमच राज्यस्तरावरील हँडबॉल व बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन पालघर जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी सुहास व्हनमाने यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास व्हनमाने, शिक्षणाधिकारी निमिष मोहिते, प्रकाश वाघ, तेजस्वी पाटील सरिता वळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण थोरात यांनी केले. तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी काही शाळा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पाठवत नाहीत. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी याविषयाकडे लक्ष वेधले असता यावर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तिथे उपस्थित असलेल्या शिक्षणाधिकारी यांना अशा शाळेतील मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी पाठवण्यात यावे असे पत्रक काढण्याचे आदेश दिले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत टाळ्यांच्या कडकडाटात केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -