कोरोना लसीबाबत आदिवासी समाजात संभ्रम

Vaccine: India get 20 lakh vaccines out of 55 million vaccines sent by US
Vaccine: अमेरिकेने जगभरात पाठवल्या ५.५ करोड लसीपैंकी भारताला मिळणार २० लाख लसी

कोरोना प्रतिबंधक लसीबाबत आदिवासी समाजात विविध प्रकारचे गैरसमज असून, लस घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजला असून, यात बाधितांचे प्रमाण आणि मृत्यू यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांमध्ये दहशत आहे. कोरोनापासून बचावासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून, मास्कसह सामाजिक आंतर आणि लॉकडाऊनचे पर्याय वापरूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण प्रचंड वाढला आहे. कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने तालुका आणि गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. सुरुवातीला लसीकरणाकडे पाठ फिरविणारे सुशिक्षित देखील आता लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रांगेत उभे आहेत.

तालुक्यातील लसीकरणाने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र यामध्ये लसीकरण करण्यात येत आहे. परंतु एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीबाबत विविध गैरसमज असल्याने तालुक्यातील कातकरी समाज लसीकरणाबाबत उदासीन आहे. कोरोना लस घेतल्याने माणसाचा मृत्यू, विविध आजार, तसेच अर्धांगवायूमुळे होतो, अशी समजूत या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली आहे. परंतु हातावर पोट असलेला आणि रोजंदारीवर जाणार्‍या गरीब आदिवासी समाजाच्या मनात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन देखील सरसावले आहे. सामाजिक संघटनांच्या मदतीने, तसेच वाडी वस्तीतील सुशिक्षित तरुण-तरुणींमार्फत लसीकरणाचे फायदे समजावले जात आहेत. श्रमजीवी संघटनादेखील यामध्ये प्रशासनाच्या मदतीला धावून आली असून आपल्या वाडी वस्तीतील संपर्काचा जोरावर कार्यकर्ते मदतीला घेऊन लसीकरणासाठी मानसिकता बदलण्याचे काम करण्यात येत आहे.

तालुक्यात 228 कातकरी वाड्या असून, कुटुंब संख्या 2 हजार 978 आहे. एकूण लोकसंख्या 17 हजार 500 च्या घरात आहे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये वाडी-वस्तीत लसीकरण याचे प्रमाण शून्य आहे. पहिल्या लाटेत कोरोना संसर्गापासून दूर असलेला आदिवासी समाज दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचे देखील दिसून आले. त्यामुळे सर्व स्तरावर लसीकरण होणे गरजेचे असल्याने प्रशासन देखील यासाठी प्रयत्नशील आहे.

जास्तीत जास्त लसीकरण व्हावे हे प्रशासनाचे देखील लक्ष्य असून, तालुका कोरोना मुक्त होण्यासाठी फिरते लसीकरण देखील करण्यात आले होते. वाडीवस्तीमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत असून, 100 टक्के लसीकरण होईल याबाबत खात्री आहे.
-इरेश चप्पलवार, तहसीलदार

श्रमजीवी संघटनेमार्फत वाडीवस्तीवर जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जगा आणि जगवा हे ध्येय घेऊन संघटना काम करीत आहे. संघटनेच्या प्रयत्नाला यश येत असून, लसीकरणासाठी अनेकजण तयार झाले आहेत.
-योगिता दुर्गे, जिल्हा महिला प्रमुख, श्रमजीवी संघटना