घररायगडनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना,राष्ट्रवादीची बाजी, प्रत्येकी तीन नगरपंचायतींमध्ये सत्ता

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना,राष्ट्रवादीची बाजी, प्रत्येकी तीन नगरपंचायतींमध्ये सत्ता

Subscribe

आगामी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातल्याने नगरपंचायतीची निवडणूक सर्वच प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, भाजप, काँग्रेस यांनी प्रतिष्ठा पणाला लावत काही ठिकाणी स्वतंत्रपणे, तर काही ठिकाणी आघाडी करून निवडणूक लढविली.

रायगड जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी झाली. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. प्रत्येकी तीन नगरपंचायती दोन्ही पक्षांनी काबीज केल्या आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातल्याने नगरपंचायतीची निवडणूक सर्वच प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, भाजप, काँग्रेस यांनी प्रतिष्ठा पणाला लावत काही ठिकाणी स्वतंत्रपणे, तर काही ठिकाणी आघाडी करून निवडणूक लढविली. आरक्षण मुद्यावरून १३ डिसेंबर आणि १८ जानेवारी अशा दोन टप्प्यात झालेल्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारी रोजी जाहीर झाला.

तळे नगराध्यक्षपदी अस्मिता भोरावकर

- Advertisement -

येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अस्मिता भोरावकर, तर उपनगराध्यक्षपदी चंद्रकांत रोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता प्रस्थापित करीत शिवसेनेला सत्तेतून पायउतार केले. त्यामुळे नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष विराजमान होणार हे स्पष्ट झाले होते. नगराध्यक्ष पदासाठी रोडे यांचे एकमेव नाव आघाडीवर असताना या पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असे पडल्याने भोरावकर यांच्यासह ग्रीष्मा बामणे आणि माधुरी घोलप यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अखेर पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते चंद्रकांत भोरावकर यांच्या पत्नी अस्मिता भोरावकर यांच्या नावाची घोषणा केली.
त्यानुसार ४ फेब्रुवारी रोजी भोरावकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी सर्व जनतेचे आभार मानले, तसेच सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माणगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

- Advertisement -

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासून प्रतिष्ठेच्या केलेल्या येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे ज्ञानदेव पोवार यांची निवड झाली आहे. शेकापच्या सदस्याने ऐनवेळी राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकल्याने पोवार यांना अपेक्षित १० ऐवजी ९ मतांवर समाधान मानावे लागले.
सत्ताधारी राष्ट्रवादीला या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला. नगरपंचायत स्थापनेनंतर शिवसेनेला प्रथमच सत्ता मिळाली आहे. नगरसेवक निवडणुकीत शिवसेना 8, काँग्रेस १, राष्ट्रवादी ७ आणि शेकापला १ जागा मिळाली. शिवसेना-काँग्रेस आघाडीतील काँग्रेसचे सदस्य पोवार ऐनवेळी शिवसेनेत दाखल झाले आणि शेकाप सदस्याचाही शिवसेनला पाठिंबा मिळेल, असे त्या पक्षाचे नेते पंडित पाटील यांनी येथे येऊन जाहीर केल्याने शिवसेनेचा मार्ग निर्धोक झाला. मात्र नाट्यमय घडामोडीत शेकापच्या एकमेव सदस्याने आपले मत राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकले. राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष आनंद यादव आणि रिया उभारे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांना अनुक्रमे ६ आणि २ मते मिळाली. या निवडणुकीच्या वेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी उपस्थिती लावली. त्यांनी पोवार यांना शुभेच्छा दिल्या. शहराच्या विकासासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरघोस निधी आणू, असे आश्वासन देसाई यांनी दिले. दरम्यान, उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे सचिन बोंबले यांची निवड झाली आहे.

पाली नगराध्यक्षपदी गीता पालरेचा बिनविरोध

प्रतिष्ठेच्या येथील नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा यांना मिळाला आहे. तर उपनगराध्यक्षपदी शेकापचे आरिफ मणियार यांची निवड झाली आहे. गुरुवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकार्‍यांनी केली.
बुधवारी शिवसेनेचे सचिन जवके यांनी नगराध्यक्ष पदासाठीचे आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यामुळे पालरेचा या एकमेव उमेदवार होत्या. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी केवळ मणियार यांचा अर्ज आला होता. यावेळी उप विभागीय अधिकारी यशवंत माने, उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंखे, नायब तहसीलदार दिलीप कोष्टी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला लोकप्रतिनिधी आणि सर्व नगरसेवकांनी केलेल्या सहकार्याबद्दल माने यांनी त्यांचे आभार मानले.

निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर घोषणा देत जल्लोष केला. त्यानंतर सर्वांनी श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. तेथून घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करून मिरवणूक काढण्यात आली. नंतर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरपंचायत कार्यालयात आले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील, शेकापचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, ग. रा. म्हात्रे, अभिजीत चांदोरकर, महेश ओसवाल उपस्थित होते.

दरम्यान, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपने आपले उमेदवार उभे न करता आघाडीच्या उमेदवारांना जाहीर लेखी पाठिंबा दिला होता. नगरपंचायतमध्ये राजकीय स्थैर्य रहावे, तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून बिनशर्त पाठिंबा दिल्याचे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी सांगितले. तर, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाला आम्ही विरोध केला नाही. मात्र आघाडीसोबत रहायचे किंवा विरोधी बाकावर बसायचे हे पक्ष श्रेष्ठींकडून आदेश आल्यावरच ठरविले जाईल. मात्र शहराच्या विकासासाठी योग्य तेथे सहकार्य करू, असे ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू पाटील आणि राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

खालापुरात शिवसेनेच्या रोशनी मोडवे बिनविरोध

शिवसेनेच्या रोशनी मोडवे यांची शहराच्या प्रथम नागरिक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी नगरपंचायत कार्यालयात पार पडली.नगराध्यक्षपदासाठी मोडवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच सेनेला नगराध्यक्षपदाचा मान मिळाला. तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पारठे यांची बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीचा फॉर्म्युला येथेही चालल्याचे स्पष्ट झाले आणि दोन्ही पक्षांच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादीचे अवघे दोन सदस्य निवडून आले आहेत. नगराध्यक्षपद सर्वसामान्य महिलेसाठी राखीव आहे. शेकापसोबत सेना सत्तेत बसणार असा अंदाज वर्तविला जात असताना राष्ट्रवादीचे पारठे निवडून आल्यापासून सेनेसोबत होते.

निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार महेद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील, सल्लागार नवीन घाटवळ, उल्हास भुर्के, रेखा ठाकरे, निलम चोरघे, संतोष विचारे, नरेश पाटील, एच. आर. पाटील, अंकित साखरे, श्याम साळवी, बाळू वाघमारे, उमेश गावंड, उत्तम परबलकर, अनिता पाटील, सुप्रिया साळुंखे, पूजा देशमुख, सारिका सावंत, अर्चना लाड, काव्य खोपकर आदींसह शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते. शिवसैनिकांच्या मेहनतीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया आमदार थोरवे यांनी व्यक्त केली.

पोलादपूर नगराध्यक्षपदी सोनाली गायकवाड

येथील नगरपंचायतीच्या नगराध्यपदी शिवसेनेच्या सोनाली गायकवाड आणि शिवसेनेचेच नागेश पवार यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. उपजिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी स्नेहा उबाळे यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी महादेव सरंबळे यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली.यावेळी जिल्हा परिषदेच सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख नीलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार आणि पदाधिकारी, सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आमदार भरत गोगावले यांनी नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

म्हसळे नगराध्यक्षपदी असहल काद्री

नगरपंचयातीच्या नगराध्यक्षपदी असहल काद्री, तर उपनगराध्यक्षपदी सुनील शेडगे यांची निवड झाली आहे. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रसचे स्पष्ट बहुमत आहे. काद्री हे वॉर्ड क्रमांक ६ आणि शेडगे वॉर्ड क्रमांक १७ मधून निवडून आले आहेत.
पदाधिकारी निवडणुकीचा निकाल निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्षपद बिनविरोध बहाल करायचे नाही, विरोधाला विरोध म्हणून काँग्रेस-सेना युतीचे 17 पैकी केवळ दोन-दोन सदस्य असताना काँग्रेसचे नगरसेवक डॉ. मुविज शेख यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीचे वातावरण निर्माण केले होते. बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काद्री निवडून आले. हात उंचावून मतदान प्रकिया पार पडली.

आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-बाजाच्या गजरात आनंदाने जल्लोष केला. तटकरे यांनी काद्री आणि शेडगे यांचे विशेष अभिनंदन केले. निवड प्रकियेला मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अली कौचाली, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष नाजीम हसवारे, मावळत्या नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका जयश्री कापरे, गटनेते संजय कर्णिक, सभापती छाया म्हात्रे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे, फझल हलदे, नसीर मिठागरे, संतोष सावंत, नईम दळवी, सतीश शिगवण, किरण पालांडे, माजी नगराध्यक्षा कविता बोरकर, भाई बोरकर, सुरेश जैन, लक्ष्मण कांबळे, यशवंत पवार उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -