घररायगडसाळाव प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ एकवटले; जमीनी परत घेण्याचा संकल्प

साळाव प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ एकवटले; जमीनी परत घेण्याचा संकल्प

Subscribe

मुरुड तालुक्यातील चेहेर, मिठेखार परिसरातील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी साळाव प्रकल्पाविरोधात एकत्रित येत जाहीर सभा घेत कंपनीकडून कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत जमीनी परत घेण्याचा संकल्प यावेळी केला. सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस परिसरातील शेकडो शेतकरी ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

अलिबाग:  मुरुड तालुक्यातील चेहेर, मिठेखार परिसरातील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी साळाव प्रकल्पाविरोधात एकत्रित येत जाहीर सभा घेत कंपनीकडून कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत जमीनी परत घेण्याचा संकल्प यावेळी केला. सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस परिसरातील शेकडो शेतकरी ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
१९८९ मध्ये कंपनीने आमच्या जमिनी घेताना आम्हाला योग्य मोबदला दिला जाईल, जोपर्यंत प्रकल्प येत नाही तोपर्यंत मानधन देण्यात येईल तसेच शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्यात येईल असे सामंजस्य करारात लिहून दिलेले असताना सुद्धा मागील ३२ वर्ष कंपनी याकडे दुर्लक्ष करून आमच्यावर अन्याय करत आहे, असे यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी आपले मनोगत मांडताना सांगितलेे. तर कंपनीने शेतकर्‍यांना कसे फसवले आणि खोटे गुन्हे दाखल केले याबाबतीत गावातील महिला शेतकरी माधुरी महादेव मुंबईकर, राजू नारायण पाटील यांच्यासह जेष्ठ महिला शेतकरी जनीबाई सुतार यांनी काही अनुभव सांगितले.
संघटनात्मक भूमिका मांडताना सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर म्हणाले की, यापुढे कंपनीला कोणत्याही प्रकारची चर्चा करायची असल्यास ती दलालांऐवजी प्रत्यक्ष शेतकर्‍यांसोबत करावी अन्यथा शेतकर्‍यांच्या रोशास सामोरे जावे लागेल. शेतकर्‍यांच्या जमिनी परत मिळाव्या या मागणीसाठी लवकरच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अ‍ॅड. विनायक शेडगे, अ‍ॅड. विकास पाटील अ‍ॅड.अमर घरत, अ‍ॅड.अक्षय गवळी (मासू) संघटनेचे जिल्हा सचिव शैलेश कोंडस्कर आणि सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेस मिठेकर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा चवरकर, सदस्या निकिता चवरकर तसेच इतर सदस्य, प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. सभेचे संचलन कृष्णा रोटकर यांनी केले.

आरपारची लढाई लढण्याचे आवाहन
यावेळी उपस्थित अनेक शेतकर्‍यांकडून कंपनीबाबत तीव्र भावना व्यक्त झाल्यानंतर महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना विशिष्ट प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जमिनीवर वेळेत प्रकल्पाची उभारणी न केल्यास शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनी परत दिल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. जमिनी परत मिळण्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढण्याची जबाबदारी शेतकरी संघटनेने घेतल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतानाच अ‍ॅड.इंगळे यांनी यापुढे आरपारची लढाई लढण्याचे आवाहन उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ शेतकरी प्रतिनिधी अजय चवरकर यांनी यापुढे परिसरातील सर्व राजकीय पक्षांशी जोडलेल्या शेतकर्‍यांनी ग्रामस्थांनी आपआपले पक्ष, गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -