घरक्रीडाअमितच्या खांद्यावर मुंबईची मदार!

अमितच्या खांद्यावर मुंबईची मदार!

Subscribe

'खडूस' ही मुंबई क्रिकेटची प्रतिमा धूसर होत असताना शिवाजी पार्कवर क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अमित पागनीसकडे मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. डावखुरा सलामीवीर असणाऱ्या अमितने ब्रेबर्न स्टेडियमसह भारतातील अनेक मैदाने गाजवली आहेत. मुंबई तसेच रेल्वेच्या रणजी जेतेपदाचा मुकुट त्याने तीनवेळा धारण केला आहे. तोच मुकुट आता परत मिळवण्यासाठी अमितला युवा आणि अनुभवी खेळाडूंची मोट बांधून गतवैभव मिळवण्यासाठी खूप घाम गाळावा लागेल. नाठाळ खेळाडूंना वठणीवर आणण्यासाठी कडक शिस्तीचा बडगा वेळप्रसंगी उचलावा लागेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रशासनाची त्याला कशी आणि कितपत साथ लाभते हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल. 

४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरणाऱ्या मुंबईला गेल्या ७ वर्षांत रणजी जेतेपदाने हुलकावणी दिली असून मुंबई क्रिकेटची पीछेहाट सुरूच आहे. साखळीतच गारद होण्याची आफत मुंबईवर अलीकडे वारंवार ओढवत आहे. गेल्या आठ वर्षांत सहा प्रशिक्षक मुंबईने नेमले. मात्र, चंदू पंडित, प्रवीण आमरे, सुलक्षण कुलकर्णी यांचा अपवाद वगळता इतरांना यश लाभले नाही. आता अमित पागनीसकडे केवळ तीन महिन्यांच्या छोट्या कालावधीसाठी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

४२ वर्षीय पागनीस हा मुंबईकर डावखुरा फलंदाज. बालमोहन शाळेचा विद्यार्थी आणि तिथेच त्याने वैद्य यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवले ते शिवाजी पार्कमध्ये. मुंबईकडून विविध वयोगट स्पर्धा त्याने गाजवल्या. मुंबईच्या संघातून खेळताना विजय मर्चंट, कुचबिहार स्पर्धेत छाप पाडल्यावर त्याची भारतीय युवा संघात निवड झाली. त्याने इंग्लंडचा दौरादेखील केला. नंतर रणजी स्पर्धेत त्याला मुंबईकडून संधी मिळाली ती सलामीवीर म्हणून. अमित पागनीस आणि वसिम जाफर अशी डावी-उजवी बिनीची जोडी मुंबईला लाभली. कर्नाटक, गुजरातविरुद्ध त्यांनी १९९९-२००० च्या मोसमात शतकी सलामी करून दिली, तर समीर दिघेच्या साथीने राजस्थानविरुद्ध अमितने मुंबईला शतकी सलामी करून दिली होती. भरवशाचा डावखुरा सलामीवीर अशी त्याची ओळख निर्माण झाली.

- Advertisement -

१९ वर्षीय अमित अचानक प्रकाशझोतात आला तो मार्क टेलरच्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध फटकावलेल्या धुंवाधार अर्धशतकामुळे. लेगस्पिनर शेन वॉर्नची त्याने चांगलीच धुलाई केली. ब्रेबर्न स्टेडियमवरील या तीन दिवसीय सराव सामन्यात डावखुऱ्या अमितने वॉर्नला पुढे सरसावत चौकार, षटकार खेचले आणि मुंबईला झकास सुरुवात करून दिली. सचिनने द्विशतक झळकावले. सचिनचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेवहिले द्विशतक ठरले.

मुंबईकडून सचिनच्या द्विशतकानंतर अमितचे अर्धशतक ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या! मुंबईकडे संजय मांजरेकर, विनोद कांबळी, वसिम जाफर असे कसोटीपटू होते, पण युवा अमितने जागतिक दर्जाच्या लेगस्पिनरच्या गोलंदाजीवर चढवलेला प्रतिहल्ला अफलातून होता. मुंबईकडून रणजी पदार्पण करणाऱ्या अमितला रेल्वेत नोकरी लागली, मग अमित रेल्वेकडून रणजीत खेळू लागला. २००१-०२ च्या मोसमात अमितने आठ सामन्यांत तीन शतके आणि तीन अर्धशतकांसह ८०० धावा फटकावत आपला ठसा उमटवला.

- Advertisement -

त्याआधीच्या मोसमतही त्याने एका शतकासह ६३४ धावा फटकावल्या होत्या. २००२-०३ मध्येही अमितने २ शतकांसह ६१९ धावा चोपल्या. लागोपाठ तीन मोसमांत धावांची लयलूट करणाऱ्या अमितला दुलीप स्पर्धेत मध्य विभागातर्फे खेळायची संधी लाभली. परंतु, नंतर त्याचा सूर हरपला. २००८-०९ नंतर त्याने रणजी स्पर्धेत खेळणे थांबवले. रणजीत जवळपास ५००० धावा करताना त्याने ८ शतके आणि २९ अर्धशतके फटकावली.

गेली तीन वर्षे अमित मुंबई क्रिकेटशी संबंधित असून दोन वर्षे २३ वर्षांखालील मुंबई युवा संघाचे प्रशिक्षकपद तोच सांभाळतोय. गेले वर्षभर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट अकादमीचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तो भूमिका बजावतोय. क्रिकेट सुधार समितीने अमितवर आता मुंबई रणजी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या तसेच मुंबई क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. त्याला आपल्यासमोरील अवघड आव्हानांची जाणीव आहे.

रणजीमध्ये मुंबई क्रिकेटची काही वर्षे ससेहोलपट सुरू असून ती रोखून मुंबई क्रिकेटची गाडी परत रुळावर आणण्यासाठी त्याचे प्रयत्न फलद्रुप होतात का? ते पाहावे लागेल. रणजी जेतेपदाशिवाय मुंबईला गत्यंतर नाही. दुसरे स्थान मुंबईकरांना रुचत नाही. मुंबई क्रिकेटचा गौरवशाली इतिहास याची साक्ष देतो. भारतीय संघाचा आगामी कर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूंची उणीव मुंबईला या मोसमात नक्कीच जाणवेल. परंतु, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे या अनुभवी खेळाडूंप्रमाणेच यशस्वी जैस्वालसारखा ताज्या दमाचा खेळाडू मुंबई संघात आहेच. यंदा आयपीएलमध्ये डझनभर मुंबईकर खेळले असून आता अमितच्या मार्गदर्शनात एमसीएच्या शोकेसमध्ये किती ट्रॉफीज येतात ते बघायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -