घरक्रीडाविश्वचषकात हार्दिकपासून सावधान!

विश्वचषकात हार्दिकपासून सावधान!

Subscribe

युवराज सिंग

भारताच्या २०११ विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख भाग असणार्‍या युवराज सिंगच्या मते आगामी विश्वचषकात भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या काहीतरी खास कामगिरी करेल. हार्दिकसाठी मागील काही काळ कठीण राहिला होता. एका कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती, तर त्याआधी त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला खेळापासून दूर रहावे लागले होते. मात्र, या सर्व गोष्टींना मागे टाकत त्याने सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना अफलातून प्रदर्शन केले आहे. त्याने या स्पर्धेच्या १३ सामन्यांत ३७३ धावा केल्या असून या धावा त्याने १९७.३५ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत.आता तो अशीच कामगिरी ३० मेपासून सुरु होणार्‍या विश्वचषकातही करेल अशी आशा त्याचा मुंबई इंडियन्स संघातील सहकारी युवराजला आहे.

मी हार्दिकसोबत चर्चा करत होतो आणि त्याला मी म्हणालो की, तुला या विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चांगले प्रदर्शन करण्याची संधी आहे. तो सध्या फारच अफलातून फॉर्मात आहे. तो खासकरून ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, ते खूपच अप्रतिम आहे. त्याने काही सामन्यांत चांगली गोलंदाजी केली आहे. मला आशा आहे की त्याचा फॉर्म विश्वचषकातही कायम राहील. मात्र, विश्वचषकात तुम्ही दबाव कशाप्रकारे हाताळता यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात, असे युवराज म्हणाला.

- Advertisement -

हार्दिकने काही दिवसांपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ३४ चेंडूत ९१ धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी म्हणजे मी आयपीएलमध्ये पाहिलेली सर्वोत्तम खेळी होती असे युवराज म्हणाला. मी त्याला सराव सामान्यांपासून पाहत आहे आणि तो तेव्हापासूनच चांगली फलंदाजी करत आहे. तो खूप चांगली फटकेबाजी करत आहे. त्यामुळे मी त्याला सुरुवातीलाच म्हणालो होतो की, तू या स्पर्धेत खास कामगिरी करशील. त्याने कोलकाताविरुद्ध जी ९१ धावांची खेळी केली, ती मी पाहिलेली आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी होती. त्याने ४ अप्रतिम गोलंदाजांविरुद्ध या धावा केल्या ही त्या खेळीची खास गोष्ट होती. जेव्हा एखादा खेळाडू चांगल्या गोलंदाजांविरुद्ध धावा करतो, तेव्हा तुम्हाला कळते की तो खेळाडू चांगली फलंदाजी करत आहे, असे युवराजने सांगितले.

चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार सांगणे अवघड

युवराज सिंग अनेक वर्षे भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळत होता. त्याचा फॉर्म खालावल्यामुळे त्याला संघातून वगळल्यापासून भारताला एकही फलंदाज मिळालेला नाही ज्याने या क्रमांकावर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्वचषकामध्ये भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार असे युवराजला विचारले असता तो म्हणाला, या प्रश्नाचे उत्तर निवड समितीच देऊ शकते. मी फक्त इतकेच सांगू शकतो की हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. मला खात्री आहे की त्यांनी संघ निवडताना याबाबत विचार केला असणार. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी या संघात २-३ पर्याय असतीलच. माझ्या मते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे अनुभव. मग तो कोणताही क्रमांक असो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -