घरक्रीडाCopa America : पेरूवर मात करत ब्राझील फायनलमध्ये; पाक्वेटाचा पुन्हा निर्णायक गोल

Copa America : पेरूवर मात करत ब्राझील फायनलमध्ये; पाक्वेटाचा पुन्हा निर्णायक गोल

Subscribe

अंतिम सामन्यात यजमान ब्राझीलसमोर अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.

ल्युकास पाक्वेटाने केलेल्या गोलच्या जोरावर ब्राझीलने पेरूचा १-० असा पराभव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाक्वेटाचा हा सलग दुसरा गोल ठरला. याआधी त्याने उपांत्यपूर्व फेरीत चिलीविरुद्ध निर्णायक गोल केला होता. आता शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात यजमान ब्राझीलसमोर अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल. ब्राझीलने आतापर्यंत जितके वेळा कोपा अमेरिका स्पर्धेचे आयोजन केले आहे, त्या प्रत्येक वेळी त्यांनीच ही स्पर्धा जिंकली आहे. यंदाही त्यांनाच जेतेपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहे.

ब्राझीलचा सुरुवातीपासून चांगला खेळ

उपांत्य फेरीत पेरूविरुद्ध ब्राझीलने सुरुवातीपासून चांगला खेळ केला. पहिल्या २० मिनिटांतच पेरूचा गोलरक्षक पेद्रो गॉलेसेला नेयमार आणि रिचार्लसन यांनी मारलेले फटके अडवावे लागले. त्यानंतर कॅसेमिरोने मारलेला फटकाही पेरूच्या गोलरक्षकाने अडवला. परंतु, ३५ व्या मिनिटाला नेयमारने पेरूच्या तीन खेळाडूंना चकवत पाक्वेटाला पास दिला आणि पाक्वेटाने चेंडू गोलजाळ्यात मारत ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ‘पाक्वेटा उत्कृष्ट खेळाडू आहे आणि सामन्यागणिक त्याच्या खेळात सुधारणा होत आहे,’ असे सामन्यानंतर नेयमार म्हणाला.

- Advertisement -

सलग १३ सामने अपराजित

उत्तरार्धात पेरूने सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मार्कोस लोपेझ आणि राझिएल गार्सिया मैदानात उतरल्याने पेरूच्या आक्रमणात सुधारणा झाली. मात्र, त्यांना ब्राझीलचा भक्कम बचाव भेदता आला नाही. त्यामुळे ब्राझीलने हा सामना १-० असा जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. ब्राझीलचा संघ आता सलग १३ सामने अपराजित आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -