घरक्रीडाCOTIF कप स्पर्धाः भारताने बलाढ्य अर्जेंटिनाला चारली धूळ

COTIF कप स्पर्धाः भारताने बलाढ्य अर्जेंटिनाला चारली धूळ

Subscribe

सध्या स्पेनमध्ये सुरू असलेल्या सीओटीआयएफ कप स्पर्धेत भारतीय संघाने आज पहाटे बलाढ्य अर्जेंटिनाच्या संघाला नमवत इतिहास घडवला आहे. या सामन्यात भारताने अर्जेंटिनावर २-१ असा विजय मिळवला.

काल रात्री देश गाढ झोपेत असताना भारतीय फुटबॉल संघाने एक इतिहास रचला. सध्या स्पेनमध्ये सुरु असलेल्या सीओटीआयएफ (COTIF) स्पर्धेत २० वर्षाखालील फुटबॉल संघाने ६ वेळा जगजेता ठरलेल्या अर्जेंटिना संघाचा पराभव केला. भारताने अर्जेंटिनाला २-१ अशा गोल फरकाने धूळ चारली. या सामन्याबाबत पहाटे साडेचार वाजता भारतीय फुटबॉल संघाच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली. सामना भारतीय वेळेनुसार रात्री २ वाजता सुरु झाला. त्यामुळे या सामन्याबाबतची कोणालाच माहिती नव्हती. परंतु भारतीय फुटबॉल संघाच्या ट्विटनंतर अनेकांनी भारतीय संघाचे कौतुक केले.

असा झाला सामना

सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या चौथ्या मिनिटाला भारताचा स्ट्राईकर दिपक तनगीरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तब्बल तासभर कोणत्याही संघाकडून गोल झाला नाही. भारतीय संघाकडे एका गोलची आघाडी असल्यामुळे अर्जेंटिनाचा संघ मोठ्या तणावात दिसला. ६८ व्या मिनिटाला भारताचा स्ट्राईकर अन्वर अली याने दुसरा गोल करत भारताची आघाडी २-० ने वाढवली. दबावात असलेल्या अर्जेंटिनाने ७२ व्या मिनिटाला पहिला गोल करत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अर्जेंटिनाचा संघ सामन्यात केवळ एकच गोल करु शकला. त्यामुळे भारताने हा सामना २-१ अशा फरकाने खिशात घातला. संपूर्ण साम्यात भारतीय संघ आक्रमक पहायला मिळाला. या सामन्यात भारतीय गोलकीपर प्रभाकरन गील याचे कौतूक करावे लागेल. कारण अर्जेंटिनाने केलेले गोलचे अनेक चांगले प्रयत्न त्याने टोलवून लावले.

- Advertisement -

क्रीडामंत्र्यांनी केले कौतुक

भारताने हा शानदार विजय मिळवल्यानंतर क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी ट्विटवरून भारतीय संघाचे अभिनंदन केले. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, ‘भारतीय फुटबॉलचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये आहे’

- Advertisement -

अनिकेत जाधवला रेड कार्ड

या सामन्यात भारताचा खेळाडू अनिकेत जाधवला ५० व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे त्याला ५० व्या मिनिटानंतर मैदानाबाहेर रहावे लागले. त्यामुळे जवळजवळ अर्धा सामना भारताने केवळ १० खेळाडुंनिशी खेळला. तरिही भारताने हा सामना जिंकलाच. अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाला नमवल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -