घरक्रीडाबोलबाला तेज गोलंदाजांचा

बोलबाला तेज गोलंदाजांचा

Subscribe

बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेत तेज गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, पाकिस्तानचा मोहम्मद आमिर, इंग्लंडचा उंचपुरा युवा तेज गोलंदाज जोफ्रा आर्चर, न्यूझीलंडचा लॅाकी फर्ग्युसन यांनी अव्वल ५ गोलंदाजांत स्थान पटकावले आहे. मिचेल स्टार्क आणि आमिर प्रत्येकी १३ बळींसह अव्वल स्थानावर आहे.

इंग्लंडमध्ये मोसमाच्या पूर्वार्धात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे ४ सामने वाया गेले. पावसाळी ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग, सीम होत असल्यामुळे वेगवान, तेज गोलंदाजांची कामगिरी प्रभावी ठरेल असा होरा होता, अन तो बव्हंशी खरा ठरला. बलवान संघांनी त्रिशतकी मजल मारली. तसेच शतकेही फटकावण्यात आली. अ‍ॅास्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड या संघांच्या विजयात तेज गोलंदाजांचा वाटा निश्चितच मोठा आहे. गेल्या वर्ल्डकप स्पर्धेत (अ‍ॅास्ट्रेलिया-न्यूझीलंड २०१५) मिचेल स्टार्क आणि ट्रेंट बोल्ट यांनी घवघवीत यश मिळवले होते. स्टार्कने सर्वाधिक २२ मोहरे टिपून ‘मालिकावीर’ हा किताब पटकावला होता.

- Advertisement -

२९ वर्षीय उंचपुर्‍या डावखुर्‍या स्टार्कने ट्रेंट ब्रिजवर विंडीजचा निम्मा संघ ४६ धावांत गारद करून अ‍ॅास्ट्रेलियन विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ओव्हलर त्याने श्रीलंकेचे ४ मोहरे ५५ धावांत टिपले. तेज, अचूक, घातक गोलंदाजी ही स्टार्कची वैशिष्ठ्ये. त्याचा यॉर्कर फलंदाजाच्या स्टम्प्सचा अचूक वेध घेतो. क्रिस गेलसारख्या फटकेबाज फलंदाजाला त्याच्या यॅार्कर्सनी सतावले, तर आंद्रे रसेलला फटकेबाजीला मुरड घालावी लागली. स्टार्कने ब्रेथवेट, जेसन होल्डर यांनाही पॅव्हेलियनची वाट दाखवली. करुणारत्ने, कुसाल परेरा यांनी श्रीलंकेला शतकी सलामी दिल्यानंतर स्टार्कने परेराचा अडसर दूर करून ऑस्ट्रेलियाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. कुसाल मेंडीस, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने यांना बाद करून स्टार्कने आपली भूमिका चोखपणे पार पाडली. पॅट कमिन्सची तोलामोलाची साथ स्टार्कला लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रतिस्पर्ध्यांना

धावा करणे कठीण जाते. स्टार्कने १३, तर कमिन्सने ११ बळी मिळवून अव्वल कामगिरी केली आहे.पाकिस्तानच्या आमिरने ४ सामन्यांत १३ बळी (भारताविरुध्द ३ बळी त्यातही विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी या आजी-माजी कर्णधारांचा समावेश) टिपून आपली छाप पाडली आहे. विंडीजने पाकला १०५ धावात रोखल्यावर आमिरच्या तेजतर्रार गोलंदाजीने क्रिस गेलसह विंडीजचे ३ मोहरे २६ धावातच गारद करून लक्षवेधक कामगिरी केली. आमिरला वहाब रियाझची साथ लाभल्यामुळे पाकिस्तानने यजमान इंग्लंडवर सनसनाटी विजय मिळवला. रियाझने इंग्लंडचे ३ मोहरे टिपताना ८२ धावा दिल्या. त्याने लागोपाठच्या चेंडूंवर मोईन अली, क्रिस वोक्स यांना पॅव्हेलियनमध्ये धाडले. आमिरने जॉस बटलर, जोफ्रा आर्चर यांना बाद करून पाकचा विजय साकारला.

- Advertisement -

न्यूझीलंडच्या लॅाकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, जिमी निशम या तेज, मध्यमगती त्रिकुटाने २३ बळी मिळवून न्यूझीलंडला अव्वल संघांमध्ये स्थान राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निशमने अफगाणिस्तानचा निम्मा संघ ३१ धावांतच गारद केला, तर फर्ग्युसनने ३७ धावांत ४ मोहरे टिपले. बांगलादेशवर विजय मिळवताना मॅट हेन्रीची गोलंदाजी घातक ठरली. त्याने ४७ धावात ४ मोहरे टिपले. श्रीलंकेला १३६ धावांत गुंडाळताना फर्ग्युसन, मॅट हेन्री यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार या भारताच्या तेज जोडगोडीने दक्षिण आफ्रिकेविरुध्द चांगली कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असून, त्याच्या तेजतर्रार मार्‍यापुढे फलंदाज बिचकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -