घरक्रीडाद्रविड सरांचा सल्ला नेहमीच येतो कामी!

द्रविड सरांचा सल्ला नेहमीच येतो कामी!

Subscribe

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना आणि अथर्व अंकोलेकर या मुंबईकर खेळाडूंचाही समावेश होता. भारताने पृथ्वी शॉच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात मागील (२०१८) विश्वचषक जिंकला होता. १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकण्याची ही भारताची चौथी वेळ होती. भारताला पुढील विश्वचषक जिंकण्याचेही प्रबळ दावेदार मानले जात आहे.

द्रविड सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद भूषवत असल्याने या संघाला त्याचे मार्गदर्शन लाभणार नाही. काही महिन्यांपूर्वी द्रविडच्या जागी पारस म्हाम्ब्रे यांची भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी निवड झाली होती. द्रविड आता या संघाचा प्रशिक्षक नसला तरी तो मदतीसाठी कधीही तयार असतो आणि त्याने दिलेला सल्ला नेहमी कामी येतो, असे विधान दिव्यांश सक्सेनाने केले.

- Advertisement -

द्रविड सर आता भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक नाहीत. मात्र, कोणत्याही दौर्‍याआधी आम्ही जेव्हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावासाठी जातो, तेव्हा ते आमची मदत करण्यासाठी तिथे असतात. ते आमच्याशी विविध गोष्टींबाबत चर्चा करतात. त्यांनी मला खेळाच्या तंत्राबद्दल फार काही सांगितलेले नाही. परंतु, मानसिकतेबाबत त्यांनी मला खूप चांगला सल्ला दिला आहे. द्रविड सर एखाद्या सामन्यात आम्हाला खेळपट्टीबाबत विचारतात.

आम्हाला खेळपट्टी समजण्यात चूक झाली असेल, तर ते ती चूक लक्षात आणून देतात. द्रविड सरांनी दिलेला सल्ला नेहमीच कामी येतो, असे दिव्यांशने सांगितले. यशस्वी जैस्वालनेही याला दुजोरा दिला. तू एका वेळी केवळ एका चेंडूचा विचार कर, असा द्रविड सरांनी मला सल्ला दिला होता. हा सल्ला माझ्या खूप कामी आला आहे, असे यशस्वी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -