मँचेस्टर युनायटेडचा विजय हुकला

इंग्लिश प्रीमियर लीग

स्टार खेळाडू पॉल पोग्बाला पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आल्याने मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात वोल्व्हसने १-१ असे बरोबरीत रोखले. या मोसमातील चेल्सीविरुद्ध पहिल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडकडून युवा मार्कस रॅशफोर्डने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले होते. मात्र, असे असतानाही या सामन्यात पोग्बाने पेनल्टी मारण्याचा निर्णय घेतला आणि त्याने मारलेला फटका वोल्व्हसचा गोलरक्षक रुई पेट्रीसियोने अडवला. मागील मोसमाच्या सुरुवातीपासून पोग्बाची अयशस्वीपणे पेनल्टी मारण्याची ही चौथी वेळ होती.

या सामन्याच्या सुरुवातीला मँचेस्टर युनायटेडने चांगला खेळ केला. मागील सामन्यात चेल्सीसारख्या संघाचा ४-० असा पराभव केल्याने त्यांच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला होता. या सामन्यात गोल करण्याची पहिली संधी युवा स्ट्रायकर अँथनी मार्शियालला मिळाली, त्याला गोल करण्यात अपयश आले, परंतु २७ व्या मिनिटाला मार्शियालला पुन्हा एक संधी मिळाली. यावेळी मात्र त्याने गोल मारण्यात चूक केली नाही. त्यामुळे मँचेस्टर युनायटेडला १-० अशी आघाडी मिळाली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत कायम ठेवली.

मध्यंतरानंतर हा सामना अधिक चुरशीचा झाला. ५५ व्या मिनिटाला जाओ मुटीन्होच्या पासवर रूबेन नेवेसने उत्कृष्ट गोल करत वोल्व्हसला १-१ अशी बरोबरी करून दिली. ६७ व्या मिनिटाला वोल्व्हसच्या कॉनर कोडीने पोग्बाला अयोग्यरित्या पडल्याने मँचेस्टर युनायटेडला पेनल्टी मिळाली, पण पोग्बाला युनायटेडला आघाडी मिळवून देता आली नाही. त्यामुळे हा सामना १-१ असा बरोबरीतच राहिला.