घरक्रीडातर दुसर्‍या राज्यातून खेळण्याचा विचार! ओम लोटलीकरचे हताश उद्गार

तर दुसर्‍या राज्यातून खेळण्याचा विचार! ओम लोटलीकरचे हताश उद्गार

Subscribe

पॅरा टेबल टेनिसपटू ओम लोटलीकर याची सर्व बाजूने कोंडी झाली आहे. सरकार दरबारी उपेक्षा. नोकरी नाही आणि प्रोत्साहन तर दूरची गोष्ट. याच नैराश्यातून मला आता दुसर्‍या राज्यातून खेळण्याचा विचार करावा लागेल, अशा उद्वेग ओमने व्यक्त केले आहे.

क्रिकेटशिवाय दुसरा कुठला खेळच नाही का? क्रिकेटबद्दल तीव्र भावना असलेल्या आपल्या देशात अस्सल मुंबईकर पॅरा टेबल टेनिसपटू ओम लोटलीकर याची सर्व बाजूने कोंडी झाली आहे. सरकार दरबारी उपेक्षा होत आहे. नोकरी नाही आणि प्रोत्साहन तर दूरची गोष्ट. याच नैराश्यातून मला आता दुसर्‍या राज्यातून खेळण्याचा विचार करावा लागेल, अशी उद्विग्न भावना ओमने व्यक्त केली आहे. ओमने तसे केल्यास एका गुणी खेळाडूला महाराष्ट्र मुकण्याची शक्यता आहे.

ओम लोटलीकर हा खेळाडू दिव्यांग असून गिरगावमध्ये एका चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत राहतो. तो जागतिक स्तरावरील खेळाडू आहे. आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ओमने अनेक पदके मिळवली आहेत. त्याचे वय २५ वर्षे आहे. घरची परिस्थिती अगदीच बेताची. आई जेवणाचे डबे बनवते तर वडील कुरिअर कंपनीत काम करतात. मागील दोन वर्षांपासून ओम सरकार दरबारी नोकरीसाठी खेटा मारतोय. पण त्याच्या पदरी निराशाच आली आहे.
ओमने २०१२ साली राष्ट्रीय स्पर्धेत खेळायला सुरुवात केली. २०१२ साली पॅरालम्पिक टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाले. २०१३ साली विद्यापीठीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत रौप्य पदक मिळविले. २०१३ साली मुंबईच्या युवा टेबल टेनिस संघात निवड झाली. २१०३ साली ओमने राज्य पॅरालम्पिक टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. २०१४ साली त्याने थायलंड येथील पॅरालम्पिक टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेतला होता. २०१५ मध्ये इंदोर येथे झालेल्या स्पर्धेत तो अव्वल आला होता. अनेक देशीविदेशी स्पर्धा खेळलेला ओम कायमच उपेक्षित राहिला आहे.

- Advertisement -

२०१८ साली जकार्ता येथे झालेल्या इंडोनेशिया ओपनमध्ये तो चौथ्या क्रमांकावर होता. सरकारने माझ्या खेळाची अद्यापही दखल घेतलेली नाही. इतर राज्यात बाकीच्या खेळांना प्रोत्साहन दिले जाते. तसे महाराष्ट्रात नाही, असे ओम सांगतो.
सध्या ओम टेबल टेनिसचे प्रशिक्षण देतो. त्यातून त्याला आठ ते दहा हजार महिना मिळतात. तो एशियन गेम्सची तयारी करत आहे. दररोज पहाटे चार वाजता उठून तो बोरिवली येथे जातो. तिथे एका क्लबमध्ये सराव करतो. सरकारी नोकरीसाठी त्याने २०१७ मध्ये पुन्हा ‘क’ श्रेणीसाठी अर्ज केला. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याची पडताळणी झाली. फाईलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्याशिवाय काम होणार नाही, असे क्रीडा विभागाकडून सांगण्यात येते, असे ओम म्हणाला.

तरीही संघर्ष करतोय
अनेक स्पर्धा खेळलो तरीही संघर्ष करावा लागत आहे. शासनाकडून पाहिजे तसे प्रोत्साहन मिळत नाही. माझे प्रशिक्षक नरेंद्र चिपळूणकर यांनी मला खूप मदत केली. भविष्यात अशा संघर्ष करणार्‍या खेळाडूंसाठी अ‍ॅकेडमी सुरू करण्याचा मानस आहे. जेणेकरून मला जेवढा त्रास झाला तो इतरांना होऊ नये – ओम लोटलीकर

- Advertisement -

भारतात चित्र उलट
ओम अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्यात खूप गुणवत्ता आहे. शासनाने क्रिकेट व्यतिरिक्तही इतर खेळांकडे लक्ष दिले पाहिजे. इतर राज्यात खेळाडू घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. बाहेरच्या देशात तर लहानपणापासूनच खेळाडू घडवला जातो. पण भारतात चित्र उलट आहे. पहिले खेळाडूला पदक जिंकून देशाचे लक्ष त्याच्याकडे खेचून घ्यावे लागते. पण शासनाने आधीच गुणवत्ता असणार्‍या खेळाडूंना योग्य प्रोत्साहन दिले तर ते नक्कीच पदक जिंकू शकतात – नरेंद्र चिपळूणकर, ओमचे प्रशिक्षक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -