घरक्रीडाIND VS WI 3rd T-20 : श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदरला मिळणार संधी...

IND VS WI 3rd T-20 : श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदरला मिळणार संधी ?

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज होणार आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकत ही मालिकाही जिंकली असल्यामुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि युवा वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते.

अय्यरचे स्थानिक क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन

मुंबईकर श्रेयस अय्यरने स्थानिक क्रिकेटच्या या मोसमात चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने यावर्षी विजय हजारे चषकाच्या ७ सामन्यांमध्ये ९३.२५ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या होत्या. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने ही स्पर्धा जिंकली होती. तसेच त्याने देवधर चषकाच्या ३ सामन्यांमध्ये सर्वाधिक १९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे अय्यरला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाल्यास फलंदाजीला अनुकूल परिस्थितीत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या घरच्या मैदानावर खेळायला मिळण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टनने याआधी ६ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यात त्याने ९ विकेट घेतल्या आहेत.

सिद्धार्थ कौल संघात

तसेच भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २१ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने मिळून गोलंदाज जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मासमोर कौल, भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद हे तीन वेगवान गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध आहेत. कौलने याआधी भारतासाठी २ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -