घरक्रीडाभारताचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश; पाचव्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजयी

भारताचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश; पाचव्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजयी

Subscribe

नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ७ धावांनी मात केली. या विजयासह भारताने ५ सामन्यांची ही मालिका ५-० अशी खिशात घातली. न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ होती. अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले, ज्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ३ बाद ११६ असा सुस्थितीत होता. मात्र, त्यांनी २५ धावांतच ६ विकेट गमावल्या. अखेरच्या षटकात ईश सोधीने दोन षटकार मारत न्यूझीलंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

रोहित शर्माचे अर्धशतक

पाचव्या सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली. त्याच्या अनुपस्थितीत मागील सामन्यात विश्रांती घेतलेल्या रोहित शर्माने भारताचे नेतृत्व केले. त्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. स्कॉट कुगलायनने सलामीवीर संजू सॅमसनला (२) माघारी पाठवत भारताला पहिला झटका दिला. मात्र, फॉर्मात असलेला लोकेश राहुल आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहितने भारताचा डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली. मात्र, राहुलने ३३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४५ धावा केल्यावर त्याला हमिश बॅनेटने मिचेल सँटनरकरवी झेलबाद केले. रोहितने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत ३५ चेंडूत टी-२० कारकिर्दीतील २१ वे अर्धशतक झळकावले. मात्र, १६ व्या षटकात पायाला दुखापत झाल्याने रोहितने माघारी परतण्याचा निर्णय घेतला. त्याने ४१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. अखेरच्या षटकांत श्रेयस अय्यर (नाबाद ३३) आणि मनीष पांडे (नाबाद ११) यांनी उत्तम खेळ केला. त्यामुळे भारताने २० षटकांत ३ बाद १६३ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

न्यूझीलंडची निराशजनक फलंदाजी

१६४ धावांचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल (२), कॉलिन मुनरो (१५) आणि टॉम ब्रूस (०) हे न्यूझीलंडचे फलंदाज झटपट माघारी परतले. परंतु, टीम सायफर्ट आणि रॉस टेलर यांनी ९९ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी शिवम दुबेने टाकलेल्या डावाच्या १०व्या षटकात तब्बल ३४ धावा चोपून काढल्या. सायफर्टने २९ चेंडूत, तर टेलरने ४२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर नवदीप सैनीने सायफर्टला (५०) माघारी पाठवत ही जोडी फोडली. शार्दूल ठाकूरने एकाच षटकात सँटनर (६) आणि कुगलायन (०) यांना बाद केले. तर टेलरने ४७ चेंडूत ५३ धावा केल्यावर त्याला सैनीने लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. बुमराहने ६ धावांवर साऊथीचा त्रिफळा उडवला. त्यामुळे न्यूझीलंडची ३ बाद ११७ वरून ९ बाद १४१ अशी अवस्था झाली. यानंतर सोधीने न्यूझीलंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -