घरक्रीडाभारताने उडवला विंडीजचा धुव्वा, तिसरा मोठा विजय!

भारताने उडवला विंडीजचा धुव्वा, तिसरा मोठा विजय!

Subscribe

भारताने वेस्ट इंडिजवर चौथ्या एकदिवसीय सामन्यात २२४ धावांनी विजय मिळवला.

रोहित शर्मा, अंबाती रायडूची शतके आणि खलील अहमद, कुलदीप यादवच्या अप्रतिम गोलांदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर चौथ्या एकदिवसीय सामन्यात २२४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील दुसरा सामना बरोबरीत संपला होता.

रोहितच्या १६२ धावा

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी डावाची चांगली सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेसाठी ७१ धावांची भागीदारी केली. ३८ धावांवर शिखरला किमो पॉलने बाद केले. तर कर्णधार विराट कोहली या मालिकेत पहिल्यांदाच शतक न मारता बाद झाला. त्याला १६ धावांवर रोचने बाद केले. पण यानंतर रोहित आणि अंबाती रायडू यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी भागीदारीची सावध सुरुवात केली. पण नंतर दोघांनीही आक्रमण केले. रोहितने ९८ चेंडूंत या मालिकेतील दुसरे तर कारकिर्दीतील २१ वे शतक झळकावले. पुढे त्याने अधिकच आक्रमक फलंदाजी करत १३१ चेंडूंत १५० धावा केल्या. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातव्यांदा १५० ची धावसंख्या पार केली. पण तो १६२ धावांवर बाद झाला. रोहितने रायडूच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी २११ धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यानंतरही रायडूने आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवली. त्याने अवघ्या ८० चेंडूंत आपल्या कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. तो १०० धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर धोनी, पुनरागमन करणारा केदार जाधव आणि जडेजा यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने ३७७ धावांचा डोंगर उभारला.

होल्डरची एकहाती झुंज

३७८ चा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली नाही. त्यांच्या ठराविक कालांतराने विकेट पडत राहिल्या. विंडीजची १० षटकांनंतर ४ बाद ४५ अशी धावसंख्या होती. पुढेही त्यांच्या विकेट पडत राहिल्या. १९ षटकांनंतर विंडीजची अवस्था ७ बाद ७७ अशी होती. यानंतर कर्णधार होल्डरने एकहाती झुंज दिली. त्याने ७० चेंडूंत नाबाद ५४ धावा केल्या. पण इतर फलंदाज खेळपट्टीवर फारकाळ टिकाव धरू न शकल्याने विंडीजचा डाव १५३ धावांवर संपुष्टात आला. खलील अहमद आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. घरच्या मैदानावर १६२ धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीराचा खिताब मिळाला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -