घरमुंबईआघाडी होण्याआधीच जागावाटपाचा वाद सुरू

आघाडी होण्याआधीच जागावाटपाचा वाद सुरू

Subscribe

आठ जागांवरील तिढा कायम

विशेष प्रतिनिधी :-आगामी निवडणुकीत सारे भेद विसरून भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या गप्पा करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सारेच आलबेल आहे, असे नाही. लोकसभेच्या ४८ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी ५० टक्क्यांचा फार्म्युला निश्चित झाला असल्याचे राष्ट्रवादीतून सांगितले जात असताना काँग्रेसला मात्र ते मान्य नाही. असा कुठलाही फॉर्म्युला अजून ठरला नसल्याचे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. विशेष म्हणजे सगळ्या विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून राजू शेट्टी यांच्यासह रिपाइं गटांना सामावून घेण्याच्या पार्श्वभूमीवर ५० टक्क्यांचा फॉर्म्युला कसा काय ठरला, अशी विचारणा काँग्रेसकडून केली जात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या ४० जागांवर सहमती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँगेसचे नेते सर्वत्र देत सुटले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत औरंगाबादमध्ये स्पष्टीकरण देताना ५० टक्क्यांवर विषय संपेल, असे सांगितले. मात्र असा फॉर्म्युला झाल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना काही ठावूक नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनाही याबाबत काही ठावूक नाही. हे कधी ठरले याची माहिती नसल्याचे हे नेते सांगत आहेत. दिल्लीत असे काही घडले की पक्षाकडून प्रदेशला याची माहिती दिली जाते. मात्र अशी कुठलीही प्रदेशला मिळाली नसल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘महानगर’ला दिली.

- Advertisement -

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनुक्रमे २६ आणि २१ जागा लढवल्या होत्या. यातील चार जागा राष्ट्रवादीने तर दोन जागांवर काँग्रेसने यश मिळवले. यशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने काही जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. यात मुंबईतील एक, पुण्यातील एक आणि औरंगाबादमधील जागेवर राष्ट्रवादीने हक्क सांगितला आहे. राष्ट्रवादीच्या या वाढीव जागांच्या मागणीमुळे आघाडीत धुसफूस असल्याचे सांगण्यात आले. एकूण जागांमधील वाद हा आठ जागांचा असल्याचे स्पष्ट झाले.

दोन पक्षातील स्थानिक नेत्यांमधील जागांबाबतचा वाद लवकरच संपेल, पण न संपल्यास आपण आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी चर्चा करुन त्यावर तोडगा काढू असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचकपणे स्पष्ट केले. भाजप विरोधात ‘ग्रँड अलायन्स’ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे त्यात कुठलाही खंड पडणार नाही, असे पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -