घरक्रीडास्मिथ, वॉर्नर परतल्याची भारतीय गोलंदाजांना चिंता नसेल - गंभीर

स्मिथ, वॉर्नर परतल्याची भारतीय गोलंदाजांना चिंता नसेल – गंभीर

Subscribe

भारताचे वेगवान गोलंदाज कोणत्याही संघाला अडचणीत टाकण्यात सक्षम आहेत, असे गंभीर म्हणाला. 

विराट कोहलीच्या भारतीय संघाने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. या मालिका विजयामुळे त्यांनी बॉर्डर-गावस्कर चषकावर आपले नाव कोरले. या मालिकेत स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज खेळले नव्हते. परंतु, भारतीय संघ यंदाही ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेत स्मिथ आणि वॉर्नर यांचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे भारताला मागील वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अवघड जाऊ शकेल. मात्र, भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर चषक आपल्याकडे ठेवण्यात यश येईल असा भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरला विश्वास आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला झुंज देईल

स्मिथ आणि वॉर्नरचे पुनरागमन झाले असले तरी भारताच्या गोलंदाजांना त्याची फारशी चिंता नसेल. भारताचे वेगवान गोलंदाज कोणत्याही संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये अडचणीत टाकण्यात सक्षम आहेत. आपण मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जे यश मिळवले होते, ते लक्षात घेता, यंदाही आपला संघ ऑस्ट्रेलियाला झुंज देईल यात शंका नाही, असे गंभीर म्हणाला.

- Advertisement -

योग्य वेळ आल्यावरच पुन्हा क्रिकेट 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या मध्यापासून भारतामध्ये क्रिकेट बंद आहे. खेळाडूंना एकत्रित सराव करण्याची परवानगीही मिळालेली नाही. मात्र, परिस्थितीत सुधारणा झाल्यावरच क्रिकेट पुन्हा सुरु होऊ शकेल असे गंभीरला वाटते. योग्य वेळ येईल, तेव्हा भारतात पुन्हा क्रिकेट सुरु होईल. पुन्हा खेळ कधी सुरु होणार हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. बीसीसीआय सर्व गोष्टींचा विचार करुन योग्य तो निर्णय घेईल. आता लोकांचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच खेळ सुरु करण्याची घाई करता कामा नये. परंतु, क्रिकेट सुरु झाले, तर लोकांमध्ये सकारात्मकता येईल हेसुद्धा खरे आहे, असे गंभीरने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -