IND vs ENG : भारताचे लक्ष्य विजयी हॅटट्रिकचे; इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना आजपासून 

भारताकडे मालिकेत सध्या २-१ अशी आघाडी आहे.

kuldeep yadav, axar patel
कुलदीप यादव आणि अक्षर पटेल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होणार असून भारताचे विजयाच्या हॅटट्रिकचे लक्ष्य असेल. भारताला या मालिकेची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. भारताने चेन्नईत झालेला पहिला कसोटी सामना गमावला. त्यानंतर मात्र भारताने दमदार पुनरागमन करत सलग दोन कसोटी सामने जिंकले. त्यामुळे भारताकडे सध्या २-१ अशी आघाडी असून आता भारताचा सलग तिसरा कसोटी सामना जिंकत मालिका ३-१ अशा फरकाने जिंकण्याचा प्रयत्न असेल. भारतासाठी चौथा कसोटी सामना विशेष महत्वाचा आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असल्यास भारताला हा सामना गमावून चालणार नाही.

ऑस्ट्रेलिया आणि भारतात स्पर्धा

भारताने हा सामना जिंकणे किंवा किमान अनिर्णित राखणे गरजेचे आहे. इंग्लंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाला आहे. परंतु, त्यांनी हा सामना जिंकल्यास भारताला अंतिम फेरी गाठणे अशक्य होईल आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे जूनमध्ये लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघांमध्ये स्पर्धा आहे.

खेळपट्टी पुन्हा फिरकीला अनुकूल 

भारतीय संघाकडे सावध खेळ करत चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्याचा पर्याय आहे. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे त्यांच्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात सावध खेळ करेल याची शक्यता कमीच आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या सामन्याची खेळपट्टीही फिरकीला अनुकूल असेल अशी चर्चा आहे. याचा फायदा पुन्हा भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल यांना होईल. याच मैदानावर झालेल्या मागील कसोटीत या दोघांनी मिळून १८ विकेट घेतल्या होत्या. तसेच चौथ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरच्या जागी चायनामन कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंविरुद्ध कसा खेळ करतात यावर या कसोटीचा निकाल ठरू शकेल.


संभाव्य संघ [अंतिम ११]  

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, उमेश यादव, ईशांत शर्मा

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), डॉम सिबली, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ऑली पोप, बेन फोक्स (यष्टीरक्षक), जोफ्रा आर्चर, डॉम बेस, जॅक लिच, जेम्स अँडरसन

सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क