Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : खेळपट्ट्यांचे करायचे काय?

IPL 2021 : खेळपट्ट्यांचे करायचे काय?

कोरोना काळात होत असलेल्या आयपीएलमध्ये बीसीसीआयने थोडे बदल केले आहेत. यंदा कोणतेही संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत नाहीत. सामने केवळ सहा मैदानांवर होणार आहेत आणि तेसुद्धा टप्प्याटप्प्याने. आयपीएलचा पहिला टप्पा नुकताच पार पडला असून सामने मुंबई आणि चेन्नई येथे झाले. चेन्नईत जवळपास सर्वच सामने ‘लो-स्कोरिंग’ झाले. चेन्नईच्या खेळपट्ट्यांवर डेविड वॉर्नर आणि बेन स्टोक्ससह भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरनेही टीका केली. चेन्नईतील खेळपट्ट्या अत्यंत वाईट होत्या, असे त्यांचे म्हणणे होते.

Related Story

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका मागील महिन्यात पार पडली. चार सामन्यांची ही मालिका भारताने ३-१ अशी जिंकली. मात्र, भारताच्या या मालिका विजयापेक्षाही जास्त चर्चा रंगली ती या मालिकेतील खेळपट्ट्यांबाबत! कोरोनानंतर भारतात झालेली ही पहिलीच मालिका ठरली. त्यामुळे संघांना जास्त प्रवास करायला लागू नये, या हेतूने बीसीसीआयने या मालिकेचे चार सामने केवळ दोन मैदानांवर खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिले दोन सामने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये, तर अखेरचे दोन सामने अहमदाबादमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाले.

चेन्नईची खेळपट्टी संथ आणि फिरकीपटूंना अनुकूल मानली जाते. अपेक्षेनुसार पहिल्या दोन्ही कसोटीत फिरकीपटूंना मदत मिळाली आणि याचा भारताचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेल यांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यानंतर अहमदाबादमध्येही हेच चित्र दिसले. तिथे फिरकीपटूंना इतकी मदत होती की तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. त्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनसह अनेकांनी या खेळपट्ट्यांवर टीका केली.

- Advertisement -

परदेशी खेळाडू आणि समीक्षकांना भारतातील खेळपट्ट्यांवर टीका करायची सवयच असल्याने वॉनच्या बोलण्याकडे फार कोणी लक्ष दिले नाही. परंतु, खेळपट्ट्यांबाबतची ही चर्चा अजूनही सुरूच आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका पार पडल्यावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धेला सुरुवात झाली. आयपीएल म्हणजे मनोरंजन! या स्पर्धेत जगातील जवळपास सर्वच सर्वोत्तम क्रिकेटपटू खेळत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यातच टी-२० क्रिकेटमध्ये चाहत्यांना चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहण्याची आता सवय झाली आहे. यंदाचे चित्र जरा वेगळे आहे.

कोरोना काळात होत असलेल्या या आयपीएलमध्ये बीसीसीआयने थोडे बदल केले आहेत. यंदा कोणतेही संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत नाहीत. म्हणजेच मुंबई इंडियन्सचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार नाही. परंतु, याच गोष्टीमुळे सामने अधिक चुरशीचे होतील, असे मत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी व्यक्त केले होते. मात्र, विराटच्या किंवा त्याच्याप्रमाणेच चुरशीचे सामने पाहण्याची अपेक्षा असलेल्यांच्या पदरी निराशा पडली आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.

- Advertisement -

यंदा सामने केवळ सहा मैदानांवर होणार आहेत आणि तेसुद्धा टप्प्याटप्प्याने. आयपीएलचा पहिला टप्पा नुकताच पार पडला असून सामने मुंबई आणि चेन्नई येथे झाले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्ट्या या लाल मातीने बनवल्या जातात. डावाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळते आणि नंतर खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होते. त्यामुळे मुंबईत झालेल्या बऱ्याचशा सामन्यांमध्ये संघांनी मोठ्या धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. धावांसाठी झुंजणाऱ्या पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनीही २०० धावांचा टप्पा पार केला.

चेन्नईची गोष्ट मात्र जरा वेगळी होती. काही वर्षांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चेन्नईच्या खेळपट्ट्यांवर टीका केली होती. चेन्नईच्या खेळपट्ट्या फारच संथ असल्याचे कॅप्टन कुल म्हणाला होता. यंदाही खेळपट्ट्यांमध्ये बदल झालेला नसून चेन्नईत जवळपास सर्वच सामने ‘लो-स्कोरिंग’ झाले. अपवाद केवळ कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद सामन्याचा. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावा केल्या आणि याचा पाठलाग करताना हैदराबादने ५ बाद १७७ अशी धावसंख्या केली. तसेच चेन्नईच्या खेळपट्टीवर केवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २०० धावांचा टप्पा पार करता आला.

बंगळुरूने कोलकाताविरुद्ध २० षटकांत ४ बाद २०४ अशी धावसंख्या उभारली होती. त्यांना द्विशतकी मजल मारणे शक्य झाले ते ग्लेन मॅक्सवेल आणि खासकरून एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे. एबीने कोलकाताच्या गोलंदाजांची धुलाई करताना अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ७६ धावा चोपून काढल्या. जिथे इतर फलंदाजांना धावा करणे अवघड जाते, तिथे एबीने अगदी सहजपणे फटकेबाजी केली. हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळा आणि खास बनवते. परंतु, चेन्नईच्या खेळपट्टीचे काय? एबी वगळता इतर फलंदाजांना आलेल्या अपयशाचे काय?

चेन्नईच्या खेळपट्ट्यांवर हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि राजस्थानचा अष्टपैलू बेन स्टोक्ससह भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरनेही टीका केली. चेन्नईतील खेळपट्ट्या अत्यंत वाईट होत्या, असे त्यांचे म्हणणे होते. चेन्नईच्या ‘वाईट’ खेळपट्ट्यांचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल, तर तो होता गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला. मुंबईकडे कर्णधार रोहित शर्मा, डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, पांड्या बंधू आणि किरॉन पोलार्ड यांसारखे अनुभवी फलंदाजी आहेत. मात्र, यंदा रोहित आणि सूर्यकुमार वगळता इतरांनी पार निराशा केली आहे.

मुंबईने यंदा सुरुवातीचे पाचही सामने चेन्नईत खेळले आणि त्यांना यापैकी केवळ दोन सामने जिंकण्यात यश आले. त्यातच या पाच सामन्यांत मिळून मुंबईच्या फलंदाजांनी दोन अर्धशतके (सूर्या आणि रोहित) केली. मुंबईकडे हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंसह पोलार्ड असल्याने त्यांच्याविरुद्ध अखेरच्या षटकांत गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजाना धडकी भरते. मागील मोसमात अखेरच्या चार षटकांत मुंबईचा १३.६१ असा रन-रेट होता. याचाच अर्थ मुंबईचा संघ अखेरच्या चार षटकांत सरासरीने जवळपास ५४ धावा करायचा. याआधी आयपीएलमध्ये अशी कामगिरी कोणत्याही संघाला जमली नव्हती.

यंदा मात्र याच मुंबईचा अखेरच्या षटकांत ७.४८ असा रन-रेट आहे. म्हणजेच मुंबईचा संघ अखेरच्या चार षटकांत मिळून सरासरीने केवळ ३० धावा करत आहे. हा मुंबईचा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी रन-रेट आहे. यावरूनच मुंबईच्या फलंदाजांना चेन्नईत धावा करण्यासाठी कशाप्रकारे झुंजावे लागले याचा अंदाज येतो. मुंबईला पाच पैकी एकाही सामन्यात १६० धावांचा टप्पा पार करता आला नाही. विक्रमी पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई संघाचे फलंदाज चेन्नईच्या खेळपट्ट्यांवर चाचपडत असतील, तर इतरांचे काय? मग जर चेन्नईच्या खेळपट्ट्यांवर खेळाडूंनी टीका केली, तर त्यात काय चुकले?

असे असले तरी चेन्नईच्या क्युरेटरना (खेळपट्टी तयार करणारे) दोष देणे चुकीचे ठरेल. चेन्नईत भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेचे दोन सामने झाले. त्यानंतर आयपीएलचे दहा सामने इथे खेळवले गेले. याचा खेळपट्ट्यांवर विपरीत परिणाम होणे स्वाभाविकच आहे. चेन्नईच्या खेळपट्ट्या या पूर्वीपासून संथ मानल्या जातात. मात्र, आयपीएलमध्ये चाहत्यांना मोठे फटके पाहायचे असतात. षटकार-चौकारांची अतिशबाजी पाहायची असते. त्यामुळे बीसीसीआयला यंदा खरेच चेन्नईत आयपीएलचे सामने खेळवण्याची गरज होती का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

- Advertisement -