जपान ओपन स्पर्धा : पी.व्ही. सिंधू स्पर्धेमधून बाहेर

भारताची बॅडमिंटनपटूस्टार पी. व्ही. सिंधूला जपान ओपनच्या बाद फेरीतून बाहेर गेली असून मोठ्या स्पर्धेतून शेवटच्या टप्प्यातून तिच्या सतत बाहेर जाण्याने सिंधूच्या चाहत्यांत नाराजी दिसून येत आहे.

pv sindhu
पी. व्ही. सिंधू

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा पराभवाला सोमोर जावं लागला आहे. जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या बाद फेरीत चीनच्या फँगजे गाओने सिंधूला नमवत स्पर्धेबाहेर केले आहे. याआधीही कॉमनवेल्थ स्पर्धा, जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सिंधूला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता जपान ओपनमध्येही सिंधूच्या पराभवाने तिच्या चाहत्यांत नाराजी दिसून येत आहे.

स्पर्धेत सुरूवातीला महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने जपानच्या सायाका टाकाहाशी हिचा २१-१७, ७-२१, २१-१३ असा पराभव केला. या सामन्यातही सिंधूने फारशी चमक दाखवली नाही. सामना अत्यंत अटीतटीचा झाला. सामन्यात पहिला सेट अगदी चुरशीचा झाला. पण सिंधूने मोक्याच्या क्षणी चांगला खेळ करत सेट २१-१७ असा जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये टाकाहाशीने अप्रतिम खेळ केला.  सिंधूकडे तिच्या फटाक्यांचे उत्तर नव्हते. त्यामुळे टाकाहाशीने हा सेट ७-२१ अशा मोठ्या फरकाने जिंकला. त्यामुळे हा सेट तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. या सेटमध्ये सिंधूने आपला अनुभव पणाला लावला. त्यामुळे तिने हा सेट २१-१३ असा जिंकत सामनाही जिंकला.

मात्र बाद फेरीच्या सामन्यात सिंधूला पराभव स्वीकारावा लागला आहे. फँगजे गाओने सिंधूला अगदी सहज धुळ चारत विजय आपल्या नावे केला आहे. पहिल्या सेटमध्ये १८-२१ च्या फरकाने फँगजेने आपला विजय नोंदविला तर त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने आपला खेळ उंचावला खरा मात्र फँगजेने अप्रतिम खेळ दाखवत १९-२१ च्या फरकाने सेट जिंकत सरळ सेटमध्ये सामना आपल्या नावे केला. या पराभवामुळे सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून ती स्पर्धेबाहेर गेली आहे.

पुरूष गटातील भारताचे आव्हान कायम

भारताची सिंधू जरी स्पर्धेबाहेर गेली असली तरी भारताचे पुरूष बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवत बाद फेरी गाठली असून त्यांचे सामने अजून बाकी आहेत. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने चीनच्या युक्सींग ह्युआंग याचा २१-१३, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर एचएस प्रणॉयने एशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या जॉनथन क्रिस्टी याचा २१-१८, २१-१७ असा पराभव करत स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे.