घरक्रीडाइतरांच्या चुकांमधून शिक!

इतरांच्या चुकांमधून शिक!

Subscribe

क्लुजनरचा रिषभ पंतला सल्ला

भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतला नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौर्‍यात धावांसाठी झुंजावे लागले. महेंद्रसिंग धोनीनंतरचा महान यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. त्यामुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र, सध्यातरी त्याला या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश येत आहे. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन शतके लगावली आहेत. परंतु, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याची कामगिरी अतिशय साधारण आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२.९० च्या सरासरीने, तर टी-२० क्रिकेटमध्ये २१.५७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यातच तो वारंवार खराब फटका मारून बाद होत असल्याने त्याच्यावर बरीच टीकाही झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी पंतला संयमाची गरज आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू लान्स क्लूजनरने व्यक्त केले.

पंतसारख्या प्रतिभावान खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात का अपयश येत आहे, हे सांगणे अवघड आहे. मात्र, त्याने संयमाने खेळले पाहिजे असे मला नक्कीच वाटते. त्याने डावाच्या सुरुवातीला वेळ घेतला पाहिजे. खेळपट्टीवर थोडा वेळ घालवल्यानंतर त्याच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूला रोखणे प्रतिस्पर्धी संघाला अवघड जाईल. तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या नाही, तर इतरांच्या चुकांमधून शिकण्याची गरज असते. याचे कारण म्हणजे, तुम्हाला स्वतःच्या चुकांमधून शिकण्यासाठी जास्त कालावधी लागतो. याउलट तुम्ही जर दुसर्‍यांच्या चुकांमधून शिकलात, तर तुमच्या खेळात लवकर सुधारणा होऊ शकते, असे क्लुजनर म्हणाला.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक असणार्‍या क्लुजनरने पुढे सांगितले, धोनीची कारकीर्द संपत असताना पंतसारखा खेळाडू संघात असणे ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे. पंतला उत्तम खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. मात्र, त्यांच्याकडून शिकत असताना त्याने नैसर्गिक खेळ करत राहणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -