घरक्रीडाधोनीवरील टीका रास्त की जास्त?

धोनीवरील टीका रास्त की जास्त?

Subscribe

५२ चेंडूत २८ धावा! ही एखाद्या कसोटी सामन्यातील नव्हे, तर सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमधील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीने केलेली खेळी आहे. या संथ खेळीमुळे धोनीवर बरीच टीका झाली. टीका करणार्‍यांमध्ये खुद्द सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. काही भारतीय चाहत्यांनी तर आता बुजुर्ग धोनीऐवजी युवा रिषभ पंतला संधी मिळाली पाहिजे असे म्हटले. मात्र, धोनीने गुरुवारी झालेल्या विंडीजविरुद्धच्या सामन्यात ६१ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान सामन्यानंतर धोनीवर झालेली टीका खरंच रास्त होती का?, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

‘अनुभव विकत घेता येत नाही, तो आव्हानात्मक परिस्थितींमधून गेल्यावरच मिळतो’, ही ओळ खेळामध्ये प्रसिद्ध आहे. मग ३४६ एकदिवसीय सामने, ९० कसोटी आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांचा अनुभव गाठीशी असणारा वर्ल्डकप विजेता माजी कर्णधार संघात असल्यामुळे भारताचे नुकसान होऊ शकते का? धोनी हा अनेक क्रिकेट समीक्षकांच्या मते क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिनिशर आहे. मात्र, मागील एक-दोन वर्षांत त्याला पूर्वीप्रमाणे अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्यात अपयश येत आहे.

- Advertisement -

तसेच तो आपल्या डावाच्या सुरुवातीला बरेच चेंडू खर्ची करतो अशीही टीका त्याच्यावर झाली आहे. परंतु, मागील दोन आयपीएलमध्ये आणि सातत्याने नसले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो अजूनही गरज असते तेव्हा फटकेबाजी करू शकतो हे त्याने दाखवून दिले आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत सलग तीन अर्धशतके लगावत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्ये त्याने १५ सामन्यांत ८३ च्या सरासरीने ४१६ धावा फटकावल्या. त्यामुळे त्याच्यावर होणार्‍या टीकांना पूर्णविराम मिळाला होता.

या वर्ल्डकपमध्ये धोनीला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी फलंदाजीची फारशी संधी मिळाली नव्हती. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ चेंडूत २७ धावांची खेळी केली. परंतु, अफगाणिस्तानविरुद्ध भारताची ४ बाद १३५ अशी अवस्था असल्याने धोनीने संयमाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अफगाणी फिरकीपटूंविरुद्ध १-२ धावा काढत धावफलक हलता ठेवण्यात अपयश आल्याने त्याला पुन्हा टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर विंडीजविरुद्धच्या सामन्यातही त्याने डावाची संथ सुरुवात केली होती. त्याला सुरुवातीच्या ४० चेंडूत केवळ २० धावा करता आल्या, पण त्यानंतरच्या २१ चेंडूत त्याने ३६ धावा चोपून काढल्याने भारताला अडीचशेची धावसंख्या पार करता आली. २६९ धावांचे आव्हान विंडीजच्या फलंदाजांना पेलवले नाही आणि भारताने सामना जिंकला. त्यामुळे ’बुजुर्ग’ धोनीवर कौतुकाचा वर्षाव झाला.

- Advertisement -

भारतासाठी फलंदाज धोनीइतकेच किंबहूना त्यापेक्षा जास्त यष्टीरक्षक धोनीचे महत्त्व आहे. तो यष्टींमागून गोलंदाजांना सतत मार्गदर्शन करत असतो. तसेच वेळोवेळी तो कर्णधार कोहलीला सल्लेही देतो. त्यामुळे कर्णधार म्हणून आपला पहिला वर्ल्डकप खेळणार्‍या कोहलीला आगामी काळात धोनीच्या अनुभवाचा खूप फायदा होणार आहे हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -