‘त्या’ प्रकरणानंतर मी खूप दारू प्यायला लागलो – अँड्रू सायमंड्स

२००८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात अँड्रू सायमंड्स आणि हरभजन सिंग यांच्यात झालेले 'मंकीगेट' हे प्रकरण खूप गाजले. पण याचा आपल्यावर वाईट परिमाण झाल्याचे अँड्रू सायमंड्सने म्हटले आहे.

अँड्रू सायमंड्स आणि हरभजन सिंग
२००८ मध्ये भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारत ४ कसोटी सामने खेळला. त्यातील दुसऱ्या सामन्यात भारताचा हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा अँड्रू सायमंड्स यांच्यात वाद झाला. त्यावेळी हरभजनने आपल्याला ‘माकड’ बोलल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते. ‘मंकीगेट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकरणात हरभजनने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. पण तरीही हरभजनवर तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र भारताने दौरा रद्द करून माघारी परतण्याची धमकी दिल्यानंतर हरभजनची शिक्षा रद्द करण्यात आली होती. असे असले तरी या प्रकरणाचा सर्वात जास्त आणि वाईट परिणाम माझ्यावर झाला असे सायमंड्सचे म्हणणे आहे.

खूप जास्त दारू पिण्यास सुरुवात केली 

मंकीगेट प्रकरणाविषयी बोलताना सायमंड्स म्हणाला, “या प्रकरणाचा माझ्यावर वाईट परिणाम झाला. मी खूप जास्त दारू प्यायला सुरुवात केली. त्यामुळे माझे आयुष्य खूप बिघडले. माझ्यात कुठेतरी एक अपराधीपणाची भावना होती. मला असे वाटत होते की मी माझ्या सहकार्यांना नको त्या गोष्टीत अडकवले. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होत होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मी चुकीचा मार्ग निवडला.”