घरक्रीडाचार दिवसीय कसोटीची गरज नाही - रिकी पॉन्टिंग

चार दिवसीय कसोटीची गरज नाही – रिकी पॉन्टिंग

Subscribe

कसोटी क्रिकेटमध्ये फारशा बदलांची गरज नसून मी चार दिवसीय सामन्यांच्या पक्षात नाही, असे विधान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र कार्यक्रम अधिक सुकर व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) २०२३ सालापासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सामने पाचऐवजी चार दिवसांचे अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. आयसीसीच्या अधिकाधिक स्पर्धा व्हाव्यात आणि द्विपक्षीय मालिकांची संख्या वाढावी, यादृष्टीने आयसीसीने चार दिवसीय कसोटी सामन्यांचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, आयसीसीचा हा प्रस्ताव पॉन्टिंगला विशेष आवडलेला नाही.

मी चार दिवसीय कसोटी सामन्यांच्या पक्षात नाही. मात्र, जे लोक बदल करण्यास सांगत आहेत, त्यांच्याकडून मला कारण जाणून घ्यायला आवडेल. मागील काही वर्षांत बरेच सामने चार दिवसांत संपले आहेत, पण बरेच सामने अनिर्णितही राहिले आहेत. या काळात जर सर्व सामने चार दिवसीय झाले असते, तर अधिक सामने अनिर्णितही राहिले असते आणि ही गोष्ट फारशा लोकांना आवडली नसती. लोकांचे मनोरंजन करणे, पैसे वाचवणे या गोष्टींचा आयसीसीला विचार लागतो, हे मला ठाऊक आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये फारशा बदलांची गरज आहे, असे मला वाटत नाही. परंतु, मला बदलांमागची कारणे नक्कीच जाणून घ्यायला आवडतील, असे पॉन्टिंग म्हणाला.

- Advertisement -

हा प्रस्ताव हास्यास्पद – गंभीर

चार दिवसीय कसोटी सामान्यांचा प्रस्ताव हास्यास्पद आहे. यामुळे अनिर्णित सामन्यांची संख्या वाढेल. फिरकीपटूंना प्रभाव पाडता येणार नाही. तसेच पाचव्या दिवशी अवघड परिस्थितीत आणि प्रतिकूल खेळपट्टीवर धावा करण्याचा आनंद फलंदाजाला मिळणार नाही. त्यामुळे आयसीसीने पाचऐवजी चार दिवसीय कसोटी सामने खेळवण्याचा विचारही करू नये, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले. गंभीरआधी भारताचा कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर, नेथन लायन, ग्लेन मॅकग्रा, रिकी पॉन्टिंग यांनी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना विरोध दर्शवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -