घरक्रीडा'या' दोघांमुळे मला कसोटी संघात संधीसाठी पाहावी लागली वाट; अक्षर पटेलचे वक्तव्य  

‘या’ दोघांमुळे मला कसोटी संघात संधीसाठी पाहावी लागली वाट; अक्षर पटेलचे वक्तव्य  

Subscribe

अक्षरची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात निवड झाली आहे.

भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने मार्चमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने पदार्पणाच्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांत २७ विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला या मालिकेत चांगलेच सतावले. या दमदार कामगिरीमुळे त्याची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात निवड झाली आहे. परंतु, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांचाही भारतीय संघात समावेश असल्याने अक्षरला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अश्विन आणि जाडेजा यांच्यामुळेच अक्षरला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्यासाठीही फार काळ वाट पाहावी लागली होती.

संधीचे सोने करण्याचा प्रयत्न

मी चांगली कामगिरी करत नव्हतो असे नाही. दुर्दैवाने दुखापत झाल्याने मला एकदिवसीय संघातील स्थान गमवावे लागले होते. कसोटी क्रिकेटमध्ये जाडेजा आणि अश्विन यांच्या दमदार कामगिरीमुळे मला संधीसाठी फार काळ वाट पाहावी लागली. जाडेजा उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने इतर एखाद्या डावखुऱ्या फिरकीपटूला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवणे अशक्यच झाले होते. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे मनगटी फिरकीपटू उत्तम कामगिरी करत होते. त्यामुळे संधी मिळाल्यावर माझा त्याचे सोने करण्याचा प्रयत्न होता, असे अक्षर एका मुलाखतीत म्हणाला.

- Advertisement -

त्यावेळी दुःख व्हायचे 

मी फार लवकर निराश होत नाही. मी भारत ‘अ’ संघाकडून सातत्याने खेळत होतो आणि भारतीय संघाची निवड होताना माझा विचार केला जायचा. त्यामुळे मला संधी मिळेल याची खात्री होती, पण त्या संधीचे मी सोने करणे महत्वाचे होते. काही वेळा चांगली कामगिरी केल्यानंतरही माझी भारतीय संघात निवड होत नसल्याचे दुःख व्हायचे. परंतु, स्थानिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना दमदार कामगिरीनंतरही भारतीय संघात संधी मिळत नाही, असेही अक्षरने नमूद केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -