घरक्रीडारोहित नव्या इनिंगसाठी सज्ज !

रोहित नव्या इनिंगसाठी सज्ज !

Subscribe

भारत-द.आफ्रिका पहिला कसोटी सामना आजपासून

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा भारत आणि तिसर्‍या स्थानावरील दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे होईल. या सामन्यात भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळताना फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला कसोटीतही सलामीवीर म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा प्रयोग यशस्वी होईल, अशी संघ व्यवस्थापन आणि निवड समिती आशा करत असेल.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितला एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यातच अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी दमदार कामगिरी केल्याने रोहितला मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता कमीच होती. मात्र, सलामीवीर लोकेश राहुलच्या निराशजनक कामगिरीचा रोहितला फायदा झाला. दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेआधी झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यातही रोहितला सलामीची संधी मिळाली होती. परंतु, प्रतिभावान रोहितला खातेही उघडता आले नाही. मात्र, सलग ५-६ सामने खेळण्याची संधी दिली, तर रोहित सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होईल, असा गौतम गंभीर, युवराज सिंग, सौरव गांगुली यांसारख्या माजी भारतीय क्रिकेटपटूंना विश्वास आहे. रोहितला सलामीला मयांक अगरवालची साथ लाभेल.

- Advertisement -

रोहितप्रमाणेच या मालिकेआधी युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतविषयी बरीच चर्चा सश्रू होती. पंतला मागील काही सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे तो आपले स्थान कायम राखणार की त्याच्या जागी अनुभवी वृद्धिमान साहाची निवड होणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वोत्तम यष्टीरक्षक असणारा साहा पहिल्या कसोटीत खेळणार हे स्पष्ट केले. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्या साथीला रविंद्र जाडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी ही गोलंदाजीची फळी आहे.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघात बर्‍याच नवख्या खेळाडूंचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी भारतात ३-० अशी कसोटी मालिका गमावणार्‍या संघातील केवळ पाच खेळाडू या मालिकेत खेळणार आहेत. मात्र, या संघात कर्णधार फॅफ डू प्लेसिस, टेंबा बवूमा, क्विंटन डी कॉक, एडन मार्करम असे फलंदाज, तर कागिसो रबाडा, व्हर्नोन फिलँडर, केशव महाराज असे अनुभवी गोलंदाज असल्याने भारताला ही मालिका जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत [अंतिम ११] : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बवूमा, थानीस डी ब्रून, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डीन एल्गर, झुबैर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनूरन मुथुसामी, लुंगी इंगिडी, एन्रिच नॉर्टजे, व्हर्नोन फिलँडर, डीन पायेड, कागिसो रबाडा, हेन्रिक क्लासन.

सामन्याची वेळ – सकाळी ९.३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -