घरक्रीडाक्रिकेटचा बाप...आयपीएलमध्ये फ्लॉप

क्रिकेटचा बाप…आयपीएलमध्ये फ्लॉप

Subscribe

 चॅलेंज देण्यात बंगळुरू अपयशी

विराट कोहली…. भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू. आपल्या सर्वोत्तम खेळाने आणि सक्षम नेतृत्वाने कोहलीने भारतीय संघाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून संघाची धुरा स्वीकारल्यानंतर कोहलीने धोनीपेक्षाही सरस कामगिरी करत कर्णधार म्हणून ६८ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना ४९ सामने जिंकले आहेत. एक कर्णधार म्हणून कोहलीने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. कोहलीची ही सर्व कामगिरी अधोरेखित करण्याचा उद्देश हाच की त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएल संघाला आलेले ’कमालीचे’ अपयश. कमालीचे याचसाठी की दिग्गज खेळाडूंची भरणा असलेल्या या संघाची कामगिरी सलग तिसर्या आयपीएल स्पर्धेत निराशाजनक झाली आहे.

सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या १२ व्या पर्वात सुरुवातीच्या पाचही सामन्यांत बंगळुरूला पराभव स्वीकारावा लागला आहे. काही सामने त्यांच्या हातून निसटले असले तरी समयसूचकतेच्या कमतरतेमुळे त्यांनी सामने गमावले. २०१६ च्या आयपीएल स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत गेलेला बंगळुरूचा संघ हैदराबाद संघाकडून पराभूत झाला.त्यानंतर या संघाला पात्रता फेरीची सीमा काही ओलांडता आलेली नाही. दिग्गज आणि आक्रमक खेळाडू ख्रिस गेल संघातून गेल्यावर बंगळुरूला साजेशी कामगिरी करता आलेली नाही हे ही तेवढेच सत्य. प्रामुख्याने कोहलीसारखा अनुभवी आणि आक्रमक कर्णधार असताना बंगळुरूवर ही वेळ का आली? किंवा आयपीएल लिलावामध्ये कागदावर भक्कम दिसणारा संघ स्पर्धेत मात्र का ढासळतो किंवा प्रतिस्पर्धी संघ या संघाला लिलया का पराभूत करतो याची अनेक कारणे देता येतील.

- Advertisement -

नाम बडे दर्शन छोटे …

माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्यामते बंगळुरू संघ कर्णधार विराट कोहली आणि फलंदाज एबी डिव्हिलियर्स या दोघांवर अधिक अवलंबून आहे. संघाच्या सुमार कामगिरीचे हे एक कारण आहे. दोघे बाद झाल्यानंतर या धक्क्यातून सावरण्याची संघात ताकदच उरत नाही, परंतु कोहली किंवा डिव्हिलियर्सने मागील सामन्यांत आपल्या कामगिरीत सातत्य राखलेले नाही. कर्णधार कोहलीने पाच सामन्यांत ३२.४ च्या सरासरीने १६२ तर डिव्हिलियर्सला ३१.२ च्या सरासरीने केवळ १५६ धावा करता आल्या आहेत. संघातर्फे पार्थिव पटेलने सर्वाधिक १६३ धावा केल्या आहेत.

भरवशाच्या म्हशीला…

गोलंदाजी ही आरसीबीची नेहमीच दुखरी नस राहिलेली आहे. गोलंदाजांचा एकमेकांबरोबर नसलेला समन्वय संघासाठी नेहमीच घातक ठरला आहे. उमेश यादव, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, नेगी, सैनी, टीम साऊथी यांसारखे चमकलेले गोलंदाज आरसीबीच्या ताफ्यात आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्यावर उत्तम कामगिरी करणारा मार्कस स्टोइनिस तसेच न्यूझीलंडचा अष्टपैलू कॉलिन डी ग्रॅण्डहोम यांसारखे खेळाडू गोलंदाजांना मदत म्हणून संघात आहेत, परंतु चहल आणि नेगी सोडता एकंदरीत सर्वच गोलंदाजांनी खराब कामगिरी केली आहे. याचेच प्रत्यंतर शुक्रवारी झालेल्या बंगळुरू विरुद्ध कोलकाता या सामन्यात आले. बंगळुरूने २०५ धावांचे मोठे लक्ष्य कोलकाता समोर ठेऊनदेखील आंद्रे रसेलच्या झंझावातापुढे बंगळुरूचा संघ टीकू शकला नाही. या सामन्यात आपला या हंगामातील पहिला सामना खेळणार्या साऊथीने ४ षटकांत १५.२५ च्या सरासरीने ६१, सिराजने २.२ षटकांत १५.४२ च्या सरासरीने ३६ तर स्टोइनिसने १.४ षटकांत २८ धावा वाटल्या. त्यामुळे आरसीबीचा सलग पाचवा पराभव झाला. तसेच गेल्या आयपीएलमध्ये निराशजनक कामगिरी करणार्या इंग्लंडच्या मोईन अलीला पुन्हा मिळालेल्या संधीचे सोने करता आलेले नाही. अष्टपैलू मोईनला ५ सामन्यांत केवळ ४२ धावा आणि फक्त १ गडी बाद करण्यात यश आले आहे.

- Advertisement -

नव्या दमात जोश दिसेना

भारतविरुद्धच्या दौर्यात उत्तम कामगिरी करणार्या वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष होते, परंतु त्याने घोर निराशा केली आहे. ४ सामन्यांत हेटमायरला केवळ १५ धावा करता आल्या आहेत. नवोदित शिवम दुबेला ३ सामन्यांत आपल्या आयपीएल कारकिर्दीत केवळ १६ धावा जोडण्यात यश आले आहे. त्यामुळे त्याचाही फटका संघाला बसला आहे.

सततच्या पराभवामुळे फॅन्सही आक्रमक

संघ जेवढा यशस्वी तेवढेच त्या संघाचे फॅनही जोशात असतात. प्रतिस्पर्धी संघ पराभूत झाल्यावर सोशल मीडियावर एकमेकांची खेचाखेची करायला फॅन्स मागे नसतात, परंतु मागील ३ वर्षांपासून खिल्ली उडवण्याचे दु:ख आरसीबी फॅन्सच्या वाट्याला सर्वाधिक आलेले आहे. सततच्या पराभवामुळे काही फॅन्सनी तर कोहलीला कर्णधार पदावरून हटवा अशीच मागणी केली आहे. मैदानाबाहेरही फॅन्स आक्रमक झालेले दिसत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे आरसीबीवर टीका करणारा समालोचक सायमन डूल याला एका चाहत्याने चक्क जीवे मारण्याची धमकी दिली. सायमन यांनीच त्यांच्या ट्विटरवरून त्यांना आलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. मात्र, स्वत: सायमन यांना तो कोणत्या वक्तव्यामुळे नाराज आहे हे कळू शकलेले नाही. ’हा चाहता माझ्यावर नाराज आहे हे स्पष्ट आहे. मात्र, म्हणून जीवे मारण्याची धमकी? हा फक्त खेळ आहे मित्रा, शांत हो’, अशा आशयाचे ट्विट डूल यांनी केले.

पुढचा प्रवास आशेवर

ऑस्ट्रेलियाचा नेथन कुल्टर-नाईल लवकरच संघात परतण्याची शक्यता आहे. तसेच संघाकडे नवख्या खेळाडूंना संधी देण्याचा पर्याय आहे. त्यामुळे पुन्हा संघाची नव्याने मोट बांधून योग्य ती व्यूहरचना करून पुढील नऊ सामन्यांत आपले आव्हान राखण्याची जबाबदारी कर्णधार कोहलीवर असेल. आयपीएल आणि आंतराष्ट्रीय सामन्यांचा तसा संबंध नसला तरी सामने जिंकून मनोधैर्य मजबूत ठेवण्याचे आव्हान कर्णधार कोहलीवर असेल. पुढील सामन्यांत आरसीबीच्या जहाजाची छिद्रे बुजवून नौका किनार्यावर आणण्याची जबाबदारी कोहलीवर असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -