घरक्रीडासायना नेहवालचे पॅकअप

सायना नेहवालचे पॅकअप

Subscribe

फ्रेंच ओपन बॅडमिंटन

भारताची आघाडीची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालचे फ्रेंच ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तिने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या अँन से यंगला चांगली झुंज दिली. मात्र, ४९ मिनिटे चाललेला हा सामना सायनाने २०-२२, २१-२३ असा गमावला.

सायनाने यावर्षी जानेवारीमध्ये इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्यानंतर तिला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. एप्रिलमध्ये झालेल्या बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेची तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर चीन, कोरिया आणि डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला होता.

- Advertisement -

फ्रेंच ओपन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सायनाचा सामना जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानी असलेल्या अँन से यंगशी झाला. या सामन्याची सायनाला चांगली सुरुवात करता आली नाही. या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये ती २-७ अशी पिछाडीवर पडली. परंतु, तिने खेळात सुधारणा करत यंगची आघाडी ७-८ अशी कमी केली. त्यानंतर सायनाने चांगला खेळ सुरु ठेवत १५-१२ अशी आघाडी मिळवली. पुढे तिला २०-१९ अशी आघाडी मिळाली होती.

परंतु, यंगने सलग तीन गुण मिळवत पहिला गेम २०-२२ असा जिंकला. दुसर्‍या गेमच्या सुरुवातीला यंगने ५-२ अशी आघाडी घेतली. पुढेही दमदार खेळ सुरु ठेवत आपली आघाडी १६-११ अशी वाढवली. मात्र, सायनाने पुनरागमन करत या सामन्यात १८-१८ अशी बरोबरी केली. त्यानंतर तिने २१-२० अशी आघाडीही मिळवली होती. मात्र, यंगने ३ गुण मिळवत हा गेम आणि सामना जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -