घरक्रीडासौराष्ट्राचे पारडे जड

सौराष्ट्राचे पारडे जड

Subscribe

व्हीसीएच्या मंद खेळपट्टीचा आमच्या गोलंदाजांनी चांगला वापर केला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर यजमान विदर्भाची ७ बाद २०० अशी अवस्था झाली आहे, या शब्दांत सौराष्ट्राचे प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी गोलंदाजांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. सोमवारी विदर्भाला झटपट गुंडाळण्याचा सौराष्ट्राचा मानस आहे. पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारल्यास आमची बाजू मजबूत होईल, असे मनोगतही कोटक यांनी व्यक्त केले.

व्हीसीएच्या खेळपट्टीवर यजमान विदर्भाने पहिल्या सत्रात संजय रामस्वामी (२), कर्णधार फैझ फझल (१६) आणि वसीम जाफर (२३) हे तीन मोहरे अवघ्या ६० धावांतच गमावले. सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने तेज मारा करून संजयला बाद केले. त्यानंतर कर्णधार आणि डावखुरा सलामीवीर फैझ फझल धावचीत झाला. पुढे उनाडकटनेच जाफरची महत्वाची विकेट काढली. ४० वर्षीय जाफरने १ षटकार आणि एका चौकारासह २३ धावा केल्या. तो खेळपट्टीवर स्थिरावतोय असे वाटत असतानाच उनाडकटने त्याला स्नेल पटेलकरवी झेलबाद करत विदर्भाला उपहारापूर्वीच मोठा धक्का दिला.

- Advertisement -

जयदेव उनाडकटला (२६ धावांत २ बळी) चेतन साकारीयाची चांगली साथ लाभली. चेतनने अचूक मारा करून १४ षटकांत १३ धावा देत अक्षय वाडकरचा एकमेव बळी मिळवला, पण दिवसाच्या अखेरीस त्याला मिळालेली मदत ही सौराष्ट्राच्या विजयची नंदी असू शकेल. ९० व्या षटकात उनाडकटने दुसरा नवा चेंडू घेतला. सोमवारी सौराष्ट्राने विदर्भाचा डाव झटपट गुंडाळला तर चेतेश्वर पुजाराला चांगली संधी लाभू शकेल. या खेळपट्टीवर चौथ्या डावात फलंदाजी करणे सोपं नाही, याची जाणीव सौराष्ट्राला झाली आहे.

विदर्भाच्या तीन विकेट लवकर पडल्यावर मोहित काळे आणि गणेश सतीश या जोडीने डाव सावरला. या दोघांनी ४६ धावांची भागीदारी केल्यावर कमलेश मकवानाच्या फिरकीवर काळे बाद झाला. उपहार ते चहापान यादरम्यान विदर्भाने ६३ धावा केल्या आणि एकमेव विकेट गमावली, परंतु चहापानानंतर विदर्भाचा डाव गडगडला तो फलंदाजांच्या खराब फटक्यांमुळे. सतीश (३२) आणि सरवटे (०) एकामागोमाग एक माघारी परतले. ६६ व्या षटकात विदर्भाची ६ बाद १३९ अशी अवस्था होती. पण वाडकरने अक्षय कर्नेवारच्या साथीने ५७ धावांची भर घातली. ही विदर्भाच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी होती. वाडकर अर्धशतक करणार असे वाटत असतानाच सकारियाने त्याला पॉईंटवर उभ्या प्रेरक मंकडकरवी झेलबाद केले. पहिल्या दिवसअखेर विदर्भाची ७ बाद २०० अशी धावसंख्या आहे. त्यामुळे त्यांनी घरच्या प्रेक्षकांसमोर पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -