घरक्रीडासध्यातरी आयपीएल श्रीलंकेत घेण्याबाबत कसलीही चर्चा नाही!

सध्यातरी आयपीएल श्रीलंकेत घेण्याबाबत कसलीही चर्चा नाही!

Subscribe

बीसीसीआय अधिकार्‍याने केले स्पष्ट

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या मोसमाचे आयोजन करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्ड (एसएलसी) उत्सुक आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्व देशांमध्ये लॉकडाऊन असल्याने सध्या आयपीएल श्रीलंकेत घेण्याबाबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याला वाटते. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने बीसीसीआयसाठी कोणताही निर्णय घेणे अवघड आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या आयोजनाचा प्रस्ताव आमच्यापुढे ठेवलेला नाही. त्यामुळे अजूनतरी कसलीही चर्चा नाही, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

करोनामुळे सध्या जवळपास सर्व देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले असून सर्वप्रकारचे खेळही बंद आहेत. जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा आयपीएलही याला अपवाद नाही. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र, करोनामुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होत नसल्याने आयपीएलचे तेरावे पर्व आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरच ही स्पर्धा होईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.

- Advertisement -

त्यामुळे यंदा आयपीएल होण्याबाबत साशंकता आहे. परंतु, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शामी सिल्वा यांनी श्रीलंकेत आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली होती. श्रीलंकेमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असून तेथे भारताच्या तुलनेत परिस्थिती लवकर पूर्ववत होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेमध्ये गॉल, कँडी आणि प्रेमदासा स्टेडियम या ठिकाणी सामने होऊ शकतील. त्यामुळे प्रवास जवळपास निम्म्यावर येईल.

भारत जुलैमध्ये श्रीलंकेत तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकांऐवजी आयपीएल झाल्यास श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फायदा होईल. परंतु, सध्यातरी बीसीसीआय यंदाचे आयपीएल सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत भारतातच घेण्यास उत्सुक आहे.

- Advertisement -

यंदाचा मोसम होणारच!
आयपीएलचा यंदाचा मोसम होणारच असा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रशिक्षक सायमन कॅटिचला विश्वास आहे. तसेच ही स्पर्धा परदेशात होऊ शकेल असे त्याला वाटते. याबाबत तो म्हणाला, यंदा आयपीएल ऑस्ट्रेलिया किंवा इतर एखाद्या देशात होऊ शकेल. तसे झाल्यास काही संघ खुश होतील आणि यात आमच्या संघाचाही समावेश असेल. आमचे बरेचसे परदेशी खेळाडू हे ऑस्ट्रेलियन किंवा दक्षिण आफ्रिकन आहेत. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियात खेळताना मजा येईल. मात्र, आयपीएलच्या आयोजनासाठी इतरही पर्याय असतील, असे कॅटिच म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -