घरक्रीडाTokyo Olympics : उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय पथकातील २२ खेळाडू, सहा अधिकाऱ्यांची उपस्थिती

Tokyo Olympics : उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय पथकातील २२ खेळाडू, सहा अधिकाऱ्यांची उपस्थिती

Subscribe

दुसऱ्या दिवशी खेळाडूंना पुरेशा विश्रांतीविना खेळावे लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला शुक्रवारपासून (उद्या) सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडणार असून या सोहळ्यासाठी भारतीय पथकातील केवळ २२ खेळाडू, सहा अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. याबाबतची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी दिली. या खेळाडूंमध्ये सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग या दोन्ही ध्वजवाहकांचा समावेश असणार आहे. शनिवारी मुख्य स्पर्धेला सुरुवात होत असून पहिल्याच दिवशी बऱ्याच भारतीय खेळाडूंना खेळावे लागणार आहे. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी खेळाडूंना पुरेशा विश्रांतीविना खेळावे लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बॉक्सिंग संघातील आठ खेळाडू

भारताचे पुरुष आणि महिला हे दोन्ही हॉकी संघ शनिवारी आपला प्राथमिक फेरीतील सामना खेळणार आहेत. मात्र, पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने उद्घाटन सोहळ्यात ध्वजवाहकाची भूमिका पार पडण्यास होकार दिला आहे. उद्घाटन सोहळ्यासाठीच्या भारतीय पथकात हॉकी संघातील एक, बॉक्सिंग संघातील आठ, टेबल टेनिस संघातील चार, नौकानयन (रोईंग) संघातील दोन, एक जिम्नॅस्ट, समुद्रपर्यटन (सेलिंग) संघातील चार, तलवारबाजीतील एका खेळाडूचा समावेश असणार आहे. त्यांच्यासोबत सहा अधिकारीसुद्धा असतील, अशी माहिती बात्रा यांनी दिली.

- Advertisement -

‘हे’ खेळाडू सहभागी होणार नाहीत 

बात्रा यांनी या आकड्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही म्हटले. तिरंदाजी, ज्युडो, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, टेनिस, नेमबाजी आणि हॉकी (पुरुष व महिला) या क्रीडा प्रकारांत खेळणारे भारतीय खेळाडू शुक्रवारी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -