घरक्रीडाUEFA EURO : युरोपात वर्चस्वाची लढाई; इंग्लंड, इटलीचे जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य

UEFA EURO : युरोपात वर्चस्वाची लढाई; इंग्लंड, इटलीचे जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य

Subscribe

इंग्लंड आणि इटली या बलाढ्य संघामधील कोणता संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवतो आणि युरोपियन फुटबॉलवर आपले वर्चस्व प्रस्थापित करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इंग्लंड फुटबॉल संघाला ५५ वर्षांपासूनचा मोठ्या स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी मिळणार असून रविवारी युएफा युरो २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडपुढे इटलीचे आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या वेम्बली स्टेडियममध्ये ६० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना खेळला जाणार आहे. वेम्बली हे इंग्लंड फुटबॉल संघाचे घरचे मैदान असून बहुतांश चाहते हे इंग्लंडचे समर्थक असण्याची शक्यता आहे. या गोष्टीचा इंग्लंडला फायदा होऊ शकेल. तीन वर्षांपूर्वी फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला क्रोएशियाकडून पराभव पत्करावा लागला होता. परंतु, या पराभवातून इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी धडा घेतला.

यंदाच्या युरो स्पर्धेतील उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही इंग्लंडने दमदार पुनरागमन करत अतिरिक्त वेळेत डेन्मार्कवर २-१ अशी मात केली. या विजयासह इंग्लंडने पहिल्यांदाच युरो स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. इंग्लंडने १९६६ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर वर्ल्डकप आणि युरो या स्पर्धांमध्ये इंग्लंडची जेतेपदाची पाटी कोरीच आहे. आता ते हा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यापासून केवळ एक सामना दूर आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे इटलीनेही दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. इटलीला २०१८ फिफा वर्ल्डकपसाठी पात्रही ठरता आले नव्हते. त्यानंतर त्यांनी रॉबर्टो मँचिनी यांची प्रशिक्षकपदी नेमणूक केली. त्यांच्या मार्गदर्शनात इटलीचा संघ मागील ३३ सामने अपराजित आहे. यंदाच्या स्पर्धेत इटलीने आपले तीनही साखळी सामने जिंकत बाद फेरी गाठली. त्यानंतर उप-उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी ऑस्ट्रिया, उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियम आणि उपांत्य फेरीत स्पेन या संघांना पराभूत केले. आता त्यांचे १९६८ नंतर पहिल्यांदाच युरो स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे इंग्लंड आणि इटली या बलाढ्य संघामधील कोणता संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवतो आणि युरोपियन फुटबॉलवर आपले वर्चस्व प्रस्थापित करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सामना कोण जिंकणार सांगणे अवघड – केन

दोन्ही संघांना ५०-५० टक्के विजयाची संधी आहे. मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा इटलीचा इतिहास आमच्यापेक्षा चांगला आहे. मात्र, आता आमच्या खेळाडूंनाही क्लब फुटबॉल खेळताना मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यांत, अंतिम सामन्यांत खेळण्याचा अनुभव आला आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार हे सांगणे अवघड आहे, असे इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने सांगितले. तसेच ६० हजार प्रेक्षकांसमोर युरो चषक हातात घेण्याविषयी तू विचार केला आहेस का, असे विचारले असता केन म्हणाला, नक्कीच. खेळाडू म्हणून तुम्ही या क्षणांचा विचार करता. मोठ्या स्पर्धा जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -