घरक्रीडाUEFA EURO : बेल्जियमची पुन्हा बाद फेरीत ‘एक्झिट’; इटली उपांत्य फेरीत

UEFA EURO : बेल्जियमची पुन्हा बाद फेरीत ‘एक्झिट’; इटली उपांत्य फेरीत

Subscribe

उपांत्य फेरीत इटलीचा सामना स्पेनशी होईल. 

निकोलो बरेला आणि लोरेंझो इंसिंये यांनी केलेल्या गोलच्या जोरावर इटलीने युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा २-१ असा पराभव केला. बेल्जियमचा संघ सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असून त्यांना यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. बेल्जियमचा सध्याचा संघ हा त्यांच्या फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम मानला जातो. परंतु, त्यांना बाद फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश येत आहे. याआधी २०१८ वर्ल्डकपमध्ये बेल्जियमला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तर २०१६ युरो स्पर्धेतही त्यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. इटलीने मात्र अप्रतिम खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

- Advertisement -

इटलीचा सुरुवातीपासूनच अप्रतिम खेळ

म्युनिक येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीने सुरुवातीपासूनच अप्रतिम खेळ केला. १३ व्या मिनिटाला इटलीला फ्री-किक मिळाली, ज्यावर लिओनार्डो बोनूचीने गोल केला. परंतु, तो ऑफसाईड असल्याने हा गोल रद्द करण्यात आला. मात्र, पहिल्या गोलसाठी इटलीला फार काळ वाट पाहावी लागली नाही. ३१ व्या मिनिटाला निकोलो बरेलाने गोल करत इटलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली, तर ४४ व्या मिनिटाला इंसिंयेने उत्कृष्ट फटका मारून गोल करत इटलीची आघाडी दुप्पट केली.

लुकाकूने गोलची संधी गमावली 

मध्यंतराआधी बेल्जियमला पेनल्टी मिळाली. यावर स्ट्रायकर रोमेलू लुकाकूने गोल केल्याने इटलीची आघाडी १-२ अशी कमी झाली. उत्तरार्धात बेल्जियमने दुसरा गोल मारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. केविन डी ब्रूनच्या अप्रतिम पासवर लुकाकूला आपला दुसरा गोल करण्याची संधी होती. त्याने मारलेला फटका इटलीचा बचावपटू स्पिनॅझोलाने अडवला. यानंतर बेल्जियमला इटलीचा भक्कम बचाव भेदता आला नाही आणि इटलीने हा सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत इटलीचा सामना स्पेनशी होईल.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -