घरक्रीडाफॉर्मात असलेल्या वॉर्नर- बेअरस्टोव मुंबई रोखणार?

फॉर्मात असलेल्या वॉर्नर- बेअरस्टोव मुंबई रोखणार?

Subscribe

आयपीएलमध्ये तीन वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स आणि एक वेळा विजेता सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात शनिवारी सामना होणार आहे. मुंबईला यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मात्र, त्यांनी आपल्या मागील सामन्यात त्याआधी अपराजित असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. दुसरीकडे या मोसमाचा पहिला सामना गामवल्यानंतर मागील वर्षी अंतिम फेरी गाठणार्‍या हैद्राबादने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. पहिल्या तीन सामन्यांत शतकी भागीदारी करणार्‍या हैद्राबादच्या डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोव या सलामीवीरांनी दिल्लीविरुद्धच्या चौथ्या सामन्यात ६४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकायची आशा असेल तर त्यांना या जोडीला लवकर बाद करावे लागेल.

मुंबईने आपल्या मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ३७ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईची फलंदाजीत सुरुवात चांगली झाली नव्हती. मात्र, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि किरॉन पोलार्ड या मधल्या फळीतील खेळाडूंनी मुंबईचा डाव सावरला. या सामन्याआधी यंदा हार्दिक वगळता यापैकी कोणालाही चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे चेन्नईविरुद्ध त्यांनी केलेले चांगले प्रदर्शन ही मुंबईसाठी आनंदाची बाब होती. तसेच गोलंदाजांनीही चेन्नईला २० षटकांत अवघ्या १३३ धावाच करू दिल्या.

- Advertisement -

लसिथ मलिंगा आणि हार्दिक यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या, तर आयपीएलमध्ये पदार्पण करणार्‍या जेसन बेहरनडॉर्फने त्यांना चांगली साथ देत २ विकेट घेतल्या. बेहरनडॉर्फने दोनही विकेट पॉवर-प्लेमध्ये घेतल्या होत्या ही मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट होती. कारण हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईसमोर यंदा सलामीवीर म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोव यांना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोव या हैद्राबादच्या सलामीवीरांनी यंदाच्या मोसमात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. हे दोघे यंदा सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या स्थानी आहेत. वॉर्नरने ४ सामन्यांत २६४ तर आपले पहिले आयपीएल खेळणार्‍या बेअरस्टोवने ४ सामन्यांत २४६ धावा केल्या आहेत. या दोघांनीही बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात शतकेही केली होती.

- Advertisement -

मात्र, या दोघांच्या कामगिरीमुळे हैद्राबादच्या मधल्या फळीतील फलंदाजांना फारशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांना वॉर्नर आणि बेअरस्टोव यांना लवकर बाद करण्यात यश आले, तर ते हैद्राबादला अडचणीत टाकू शकतील. एकूणच हा सामना मुंबई विरुद्ध हैद्राबाद असा होणार असला तरी वॉर्नर-बेअरस्टोव विरुद्ध मुंबईचे गोलंदाज या लढतीकडेही चाहत्यांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना मुंबईचे गोलंदाज रोखू शकतात का, हे पाहणे रंगतदार ठरणार आहे.

संभाव्य ११ खेळाडू –

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मयांक मार्कंडे/ राहुल चहार, लसिथ मलिंगा, जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह.

सनरायजर्स हैद्राबाद : डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टोव (यष्टीरक्षक), विजय शंकर, मनिष पांडे, दीपक हुडा, युसूफ पठाण, मोहम्मद नबी, राशिद खान, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -