घरमहाराष्ट्रपिण्याच्या पाण्यात अळ्या

पिण्याच्या पाण्यात अळ्या

Subscribe

टाकी रिकामी करून केली साफ

शहराला पुरवठा होत असलेल्या पिण्याच्या पाण्यात दादली गावासह शहरातील काही भागात सूक्ष्म अळ्या आढळून आल्या आहेत. या घटनेनंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ज्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून हे पाणी पुरवले जाते तेथील टाकी पूर्णतः रिकामी करून साफ केली गेली आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.

कुर्ला आणि कोथुर्डे या दोन धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. कुर्ला धरणातून आलेले पाणी दादली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध केले जाते. या ठिकाणी क्लोरिनेशन, सॅण्ड ट्रीटमेन्ट आदी प्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर शहरातील तांबटआळी, प्रभात कॉलनी, मधली आळी, कुंभार आळी, गवळ आळी, कोट आळी, जुनी बाजारपेठ या भागात पाणीपुरवठा केला जातो. यासह दादली आणि किंजळघर या दोन गावांनादेखील पाणी पुरवठा याच योजनेतून केला जातो.

- Advertisement -

गुरुवारी कुर्ला येथून आलेल्या पाण्यात दादली येथील नागरिकांना सूक्ष्म अळ्या आढळून आल्या. त्यानंतर त्यांनी नगर पालिकेत याबाबत माहिती दिली. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. जवळपास 8 लक्ष लीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या टाकीतील पाणी या घटनेनंतर सोडून देण्यात आले. त्यानंतर संपूर्ण टाकी साफ केली गेली. पुन्हा आलेल्या पाण्यावर क्लोरिनेशन आणि इतर प्रक्रिया करून शुक्रवारी पाणी पुरवठा पूर्ववत केला गेला आहे. याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे सकुंडे यांनी दिली.

दादली, तांबटआळी, प्रभात कॉलनी, मधली आळी, कुंभार आळी, गवळ आळी, कोट आळी, जुनी बाजारपेठ भागात आलेल्या पाण्यातदेखील या अळ्या सापडल्या आहेत. याचे नमुने तपासणीकरिता पालिका प्रशासनाने पाठवून दिले आहेत. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य ऐन उन्हाळ्यात धोक्यात आले आहे. पालिका प्रशासनाचे कर्मचारी आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने असा प्रकार घडला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

- Advertisement -

नगर पालिकेच्या दादली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील टाकीमधून आलेल्या पाण्यात अळ्या असल्याची माहिती मिळाली. पाहणी केली असता तेथील अस्वच्छतादेखील त्याला कारणीभूत असू शकते. टाकी पूर्णतः साफ केली गेली असली तरी नागरिकांनी पाणी गळून आणि उकळून प्यावे.
-जीवन पाटील, मुख्याधिकारी, महाड नगर पालिका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -