वेलिंग्टन आणि लकी पदार्पण

Ravi Shashtri
रवी शास्त्री

रवी शास्त्रींचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण स्वप्नवतच ठरले. बरोब्बर 39 वर्षांपूर्वी 21 फेब्रुवारी 1981 रोजी वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर 18 वर्षीय रवीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दिलीप दोशी आणि शिवलाल यादव या फिरकी जोडगोळीला दुखापत झाल्यामुळे कर्णधार सुनील गावस्करने पॉली उम्रीगर यांच्या निवड समितीकडे रवीबाबत आग्रह धरला आणि मुंबईसाठी कानपूरमध्ये रणजी सामना खेळणारा पोरसवदा रवी 20 तासांच्या विमान प्रवासानंतर वेलिंग्टनला पोहोचला.

भारतीय संघाचे सहाय्यक व्यवस्थापक बापू नाडकर्णी यांनी रवीचे स्वागत केले. अन् भारताचा 151 वा कसोटीपटू म्हणून रवीला कॅप देण्यात आली. जुजबी विश्रांतीनंतर रवी बेसिन रिझर्व्हवर उतरला. कपिल देव, योगराज (त्याची देखील ही पदार्पणाचीच कसोटी, पहिली आणि अखेरचीच )रॉजर बिन्नी, संदीप पाटील यांच्यासह कॉलेजियन रवीवर भारतीय गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली.

किवीजचा कर्णधार जेफ हॉवर्थला आपले पहिलेवहिले षटक (बापू नाडकर्णीसारखीच रवीची गोलंदाजीची शैली )निर्धाव टाकले ! जेरेमी कोनीला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल पकडून रवीने कसोटीमध्ये आपले बळींचे खाते उघडले. इंटर कॉलेजिएन मॅचप्रमाणेच गोलंदाजी करत रवीच्या डावखुर्‍या फिरकीने स्नेडन, गॅरी ट्रूप यांनाही बाद केले. 54 धावांत 3 बळी ही त्याची कसोटीतील पहिली कमाई दुसर्‍या डावात तर रवी शास्त्री – दिलीप वेंगसरकर यांनी न्यूझीलंडच्या शेपटाची झटपट पॅव्हिलियनमध्ये रवानगी केली.

लान्स केर्न्स, स्नेडन, ट्रप यांचे झेल टिपले दिलीप वेंगसरकरने. 4 चेंडूत 3 विकेट्स अशी कमाल करणार्‍या रवीने आपले कसोटी पदार्पण सार्थकी ठरवताना 9 धावांतच 3 मोहरे टिपले. किवीजचा दुसरा डाव 100 धावांतच आटोपला. पण पहिल्या डावातील 152 धावांची पिछाडी भारताला भारी पडली आणि यजमान संघाने 62 धावांनी विजय मिळवला.

कसोटी पदार्पणात 6 तर मालिकेत 15 बळी टिपून रवीने सार्‍याची शाबासकी मिळवली. ऑकलंड कसोटीत त्याने 7 बळी मिळवून सामनावीर ’किताब पटकावला. भारतीय संघांचे व्यवस्थापक विंग कमांडर दुराणी यांना हरियाणाच्या राजिंदर गोयलला बोलवयाचे होते. पण कर्णधार गावस्कर, सहाय्यक व्यवस्थापक बापू नाडकर्णी यांनी निवड समितीचे अध्यक्ष पॉली उम्रीगरना सांगून रवीचीच यशस्वी शिफारस केली. रवीनेदेखील पुढे काय केले ते सर्वश्रुतच आहेच.