World Cup 2019 – इतिहासाची पुनरावृत्ती! पाकिस्तानसमोर वर्ल्डकपमध्ये भारत अजिंक्यच!

भारत विरूद्ध पाकिस्तानमध्ये रविवारी झालेल्या वर्ल्डकप २०१९ सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.

ind vs pak match
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

अखेर ज्याची शक्यता होती, नव्हे खात्रीच होती, तेच झालं. भारतानं पुन्हा एकदा वर्ल्डकपमधल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली! यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत कुठल्याच सामन्याबद्दल इतकी उत्सुकता, इतकं गांभीर्य, इतकी गुंतवणूक आणि चाहत्यांचा इतका पाठिंबा दिसला नाही, जितका तो रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये दिसला. आणि ते अपेक्षितही होतं. वर्ल्डकपची घोषणा झाल्यापासून ज्या सामन्याबद्दल भारत-पाकिस्तानमधल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती, त्या सामन्यात तमाम भारतीयांच्या अपेक्षेप्रमाणेच भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरूद्ध अपराजित राहाण्याचा आपला विक्रम कायम राखला! या विजयासह भारताचे ७ गुण झाले असून पॉइंट टेबलमध्ये भारत आता न्यूझीलंडच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वारंवार पडणाऱ्या पावसामुळे पाकिस्तानच्या ३५ ओव्हर शिल्लक असताना खेळ थांबवण्यात आला. पुन्हा खेळ सुरू झाला, तेव्हा पाकिस्तानला अवघ्या ५ ओव्हरमध्ये १३६ धावांचं सुधारित लक्ष्य ठेवण्यात आलं. या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करण्यात पाकिस्तान अपयशी ठरलं आणि भारत पुन्हा अजिंक्य ठरला!


विशेष घटना!

  • पाकिस्तानविरूद्ध वर्ल्डकपमध्ये भारत पुन्हा अजिंक्यच ठरला
  • विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यांमधल्या ११ हजार धावा पूर्ण केल्या!
  • वर्ल्डकप कारकिर्दीत पहिल्याच बॉलवर विकेट काढणारा विजय शंकर पहिला भारतीय बॉलर ठरला!
  • रोहीत शर्माने यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक ठोकलं!

टॉस पाकिस्ताननं जिंकला

खरंतर टॉस पाकिस्तानच्या कप्तान सरफराज अहमदनं जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पाकिस्ताननं फिल्डींगचा निर्णय घेतला. पण टीम इंडिया पूर्णपणे कॉन्फिडंट होती. शिखर धवनच्या अनुपस्थितीत रोहीत शर्मासोबत के. एल. राहुल ओपनिंग करण्यासाठी मैदानात उतरला. या दोघांनी सुरुवात संथ केली. त्यांच्यावर दबाव असल्याचं वाटत असतानाच एकीकडून रोहीत शर्मानं आक्रमणाला सुरुवात केली. या दोघांनी २३.५ ओव्हर्समध्ये म्हणजे जवळपास एकूण डावाच्या अर्ध्या ओव्हर्समध्ये १३६ धावांची सलामी ठोकली. तिथेच पाकिस्तानी चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसू लागली होती. वहाब रियाजनं राहुलला माघारी धाडलं तोपर्यंत त्यानं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं होतं.

रोहीत शर्माचं दणदणीत शतक

राहुल बाद झाल्यानंतर कप्तान विराट कोहलीनं रोहीतच्या साथीनं पाकिस्तानी बॉलर्सचा समाचार घ्यायला सुरुवात केली. या दोघांनी ८७ बॉलमध्ये ९८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहीत शर्मानं यंदाच्या वर्ल्डकपमधलं त्याचं दुसरं शतक दणक्यात साजरं केलं. १४० रनांवर रोहीत शर्माचा कॅच हसन अलीनं पकडला. या खेळीत त्यानं १४ चौकार आणि ३ षटकार खेचले. २३४वर रोहीत माघारी परतल्यानंतर लगेच २८५ स्कोअर असताना हार्दिक पंड्या २६ रनांवर आऊट झाला. त्यानंतर आलेला एम एस धोनी पाकिस्तानी बॉलिंगची पिसं काढेल असं वाटलं होतं. पण तो दुसऱ्याच बॉलवर विकेट कीपर सरफराज अहमदकडे कॅच देऊन माघारी परतला. या दरम्यान विराट कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतलं ५१वं अर्धशतही झळकावलं. भारताचा स्कोअर ३१४ असताना ४८व्या ओव्हरमध्ये विराट कोहली बाद झाला.


हेही वाचा – क्या बात है! त्यांनी चक्क लग्नातच केलं भारत-पाक सामन्याचं प्रक्षेपण!

पाकिस्तानी बॅट्समन्सनी नांग्या टाकल्या!

विजयासाठी ३३७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी देखील भारतीय सलामीवीरांप्रमाणेच संथ सुरुवात केली. पण त्यांचा संयम फार काळ टिकू शकला नाही. पाचव्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्याच्या ओव्हरचे शेवटचे दोन बॉल टाकण्यासाठी आलेल्या विजय शंकरनं त्याच्या वर्ल्डकप करिअरमधल्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. इमान उल हकला ७ रनांवर त्यानं माघारी धाडलं. एका बाजूने फखर झमन आश्वासक खेळी करत असताना दुसऱ्या बाजूने मात्र त्याला साथ मिळाली नाही. इमामनंतर आलेल्या बाबरनं काही प्रमाणात समजुतदार खेळ केला. मात्र, वैयक्तिक ४८ धावांवर कुलदीप यादवनं त्याला त्रिफळाचीत केलं. तेव्हा पाकिस्तानचा स्कोअर होता २४ ओव्हरमध्ये ११७ धावा.

पाकिस्तानची मधली फळीही अपयशी

त्यानंतर मात्र पाकिस्तानचा डाव सावरू शकला नाही. पुढच्याच ओव्हरमध्ये ६२ धावा करून खिंड लढवणारा फखर झमान कुलदीप यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यानंतरची हार्दिक पंड्यानं टाकलेली २७वी ओव्हर सर्वात नाट्यमय ठरी. या ओव्हरच्या शेवटच्या २ बॉलवर पंड्यानं लागोपाठ मोहम्मद हफीज आणि शोएब मलिक या पाकिस्तानी बॅटिंगच्या मधल्या फळीच्या आधारस्तंभांना तंबूचा रस्ता दाखवला. पुढे संथ खेळी करून पाकिस्तानचा डाव सावरायचा प्रयत्न करणाऱ्या सरफराज अहमदला देखील ३३व्या षटकात विजय शंकरनं बाद केलं.