घरठाणेभात खरेदीत अपहार करणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल

भात खरेदीत अपहार करणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल

Subscribe

शासनाच्या भात खरेदीत झोल करणाऱ्या आदिवासी विकास महामंडळातील चौघांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता भात खरेदीच्या खोट्या कागडपत्रांद्वारे भात खरेदीत झोल करून तब्बल ९५ लाखाचा अपहार करणाऱ्या आदिवासी विकास महामंडळातील प्रादेशिक व्यवस्थापकसह सहा जणांवर शहापुर पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार केलेल्या या धडक कारवाईमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मे व जून २०२१ मध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या पळशीन येथील केंद्रावर झोल करण्यात आला असल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी करण्यात आली होती. या समितीने संपूर्ण भात खरेदी संशयास्पद असल्याचा अहवाल दिल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहापुर पोलीस ठाण्यात आदिवासी विकास महामंडळाचे जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, शहापुरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष वसावे, कर्मचारी गुलाब सदगीर, गोकुळ राठोड, पळशीन केंद्रप्रमुख सखाराम जाधव व संस्था सचिव भरत घनघाव या सहा जणांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पळशीन केंद्रांतर्गत रब्बी हंगामात लागवड करून पीक घेतले नसताना भात खरेदीचे खोटे दस्तऐवजाद्वारे तीन हजार ५०४ क्विंटल भाताची अफरातफर करून ५६ लाख ८६ हजार १९२ रुपयांचा अपहार करण्यात आला होता. तर बोगस भात खरेदी दाखवून तब्बल ३६ लाख ५५ हजार १६३ रुपये किंमतीचा एक हजार ४२५ क्विंटल भात भरडाईसाठी उचलण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. असा एकूण ९३ लाख ४१ हजार ३५५ इतक्या रकमेचा अपहार करण्यात आला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास भरोदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -