घरठाणेसर्व यंत्रणांनी सतर्क रहावे-आयुक्त अभिजीत बांगर

सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे-आयुक्त अभिजीत बांगर

Subscribe

 महापालिका, मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलीसांच्या बैठकीत मान्सूनपूर्व आढावा

 पावसाळापूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी यापूर्वी १९ मे २०२३ रोजी बैठक घेवून सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र घोडबंदर रस्त्यावर मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता व पावसाळी गटारे खणलेल्या अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर मेट्रोच्या परिसरात पाणी साठण्याची फार मोठी शक्यता आहे. ही परिस्थिती उदभवू नये व आवश्यक पावले आताच उचलली जावीत यासाठी मेट्रो प्रशासनासोबत विस्तृतपणे संपूर्ण मेट्रोच्या लांबीमधील प्रत्येक स्थळनिहाय सध्याच्या परिस्थितीची सद्यस्थिती याबाबतचा मंगळवारी आढावा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात महापालिका व मेट्रो प्राधिकरणामार्फत विविध कामे सुरू असून ही कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करावीत. पावसाळयात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका, मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलीस या यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावीत, पावसाळ्यात कोणत्याही ठिकाणी पाणी साचणार नाही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सद्धस्थितीतील कामे ही तातडीने पूर्ण करण्याचे  निर्देश आज झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व यंत्रणांना दिले.
ठाण्यात मॉडेला ते तीन हात नाका, नितिन कंपनी जंक्शन- कॅडबरी – माजिवडा – कापूरबावडी- मुल्ला बाग – कासारवडवली – वाघबीळ जंक्शन ते पंचामृत सोसायटी अशा विविध टप्प्यात मेट्रोची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या कामांमुळे  रस्त्यावर काही ठिकाणी माती पडलेली आहे, काही ठिकाणी काम सुरू नाही पण बॅरीकेटस् लावलेले आहेत, ते बॅरीकेटस् काढून घ्यावेत जेणेकरुन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा होण्यास मदत होईल. तसेच ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत व ज्या ठिकाणी खड्डा खणला आहे, तेथे बॅरीगेटस् लावावेत. ड्रेनेज लाईन नाल्याला जोडलेल्या आहेत का याची प्रत्यक्ष जागेवर जावुन पाहणी करणे, नसल्यास तातडीने ती कामे करुन घेणे, तसेच काही ठिकाणी गटाराची कामे अर्धवट अवस्थेत आहेत ती कामे येत्या चार दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्त शबांगर यांनी दिल्या.
गेल्यावर्षी पावसाळ्यात आर- मॉल, मानपाडा, वाघबीळ या परिसरात मोठा पाऊस झाल्यावर पाणी साचले होते, यंदा त्या ठिकाणी पाणी साचणार नाही या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. डोंगरभागातून येणारे पाणी हे थेट रस्त्यावर येते त्यासाठी पावसाळ्यात पंप उपलब्ध करुन पाण्याचा निचरा होईल हे पहावे. पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सूचित केले. पावसाळा अजून सुरू झालेला नसल्यामुळे सर्व यंत्रणांना सुरू असलेली उर्वरित कामे करण्यासाठी वेळ आहे. या कालावधीचा फायदा घेवून कामे  तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्त बांगर यांनी दिल्या. पावसाळ्यात परिस्थिती कशी असेल हे आता आपण कोणीही सांगू शकणार नाही, त्यामुळे परिस्थितीनुरूप काम करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावण्याच्या सूचनाही आयुक्त बांगर यांनी दिल्या.
 मेट्रोचे पिलर उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात येते. पिलर उभारण्याचे काम झाल्यानंतर त्याच्या सभोवती मोठा खड्डा निर्माण होतो, अशा प्रकारचे खड्डे वेळीच न बुजविल्यास या ठिकाणी पाणी साचून संपूर्ण परिसरात पाणी साचून वाहतूक कोंडी होईल शिवाय खड्डा किती खोल आहे याचा अंदाज न आल्यास अपघात देखील होण्याची शक्यता आहे तरी मेट्रो मार्गावर उभारण्यात आलेल्‌या सर्व पिलरची पाहणी करुन ज्या ठिकाणी खड्डे असतील ते योग्य पध्दतीने बुजविण्याची कार्यवाही करावी तसेच आवश्यकतेनुसार माहिती फलक लावण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. मेट्रोच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मान्सूनपूर्व कामे ही येत्या दोन ते चार दिवसात पूर्ण केली जातील तसेच पावसाळयात आपत्कालीन यंत्रणाही सज्ज असेल असे मेट्रो प्रधिकरणाच्या  अधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केले.

लोकप्रतिनिधींचाही सल्ला घ्या.
वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी एकाच प्रभागात काम करीत असल्यामुळे त्यांना संपूर्ण परिसराची माहिती असते. कोणत्या ठिकाणी पाणी साचते, ती ठिकाणे स्थानिक लोकप्रतिनिधींना माहित असतात, त्यामुळे लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून वेळीच आवश्यक त्या उपाययोजना करुन त्याप्रमाणे कार्यवाही केल्यास पावसाळयात आपल्याला  परिस्थ‍ितीला सामोरे जाणे शक्य होईल.

भरतीच्यावेळी सज्ज रहावे
पावसाळयात भरतीचे जे दिवस असतील त्यावेळी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. ठाणे महापालिकेची संपूर्ण टीम सज्ज असणारच आहे, त्याचबरोबर मेट्रो प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांनी देखील प्रत्यक्ष जागेवर उपस्थित रहावे, जेणेकरुन पाणी साचल्यास तातडीने उपाययोजना करणे शक्य होईल. सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल हे सुरू ठेवावेत, फोन बंद आहे, नेटवर्क नाही अशा सबब ऐकून घेतल्या जाणार नाही असेही निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -