घरthaneपलावावासियांना मालमत्ता करात 66 टक्के सूट देण्याचा निर्णय

पलावावासियांना मालमत्ता करात 66 टक्के सूट देण्याचा निर्णय

Subscribe

26 हजार सदनिकाधारकांना मिळणार कर सवलतीचा लाभ

कल्याण ग्रामीण मधील कल्याण – शिळ मार्गावरील मौजे निळजे, काटई, घेसर, उसरघर, माणगांव आणि हेदूटणे येथे मे. लोढा डेव्हलपर्स यांनी पलावा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प विकसित केला होता. या प्रकल्पाचा कोणताही भार महापालिका प्रशासनावर येत नसतानाही येथील रहिवाशांकडून संपूर्ण कराची आकारणी केली जात होती. याबाबत स्थानिक आमदार राजू पाटील यांनी कर सवलत मिळावी, म्हणून अनेकदा केडीएमसी प्रशासन व राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलावा वसाहतीतील रहिवाशांना करात 66 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याने 26 हजार सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मौजे निळजे, काटई, घेसर, उसरघर, माणगांव आणि हेदूटणे या गावांमध्ये पलावा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प करण्यास नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र व बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांतर्गत रस्ते, अंतर्गत दिवाबत्ती व्यवस्था, जल निःस्सारण , मल निःस्सारण व्यवस्था ,अग्निशमन व्यवस्था,शाळा,पोलीस चौकी आदी सराव पायाभूत सुविधा विकासकामार्फत उपलब्ध करून दिल्या गेल्या असल्याने याचा कोणताही भार महापालिकेवर पडत नाही. तरीही महापालिकेकडून पलावा इमारतीतील सदनिकाधारकांकडून प्रती वर्ष प्रती सदनिका अंदाजे 6 हजार रुपये मालमत्ता कराची मागणी केली जात होती. ही मागणी रास्त असल्याने स्थानिक आमदार राजू पाटील यांनी याबाबत केडीएमसी प्रशासन व राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा केला होता . महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात 20 नोव्हेंबर 2018 रोजी आयटीपी प्रकल्पामधील नागरिकांना मालमत्ता करात 66 टक्के सवलत देण्याचे परिपत्रक सरकारने काढले होते. मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नव्हती.

- Advertisement -

सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील पलावावासियांचा प्रश्न उपस्थित केला. त्या मागणीवर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनीही सकारात्मक भूमिका घेत 66 टक्के कर सवलतीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे यापुढे पलावा येथील वसाहतीला मालमत्ता करात तब्बल 66 टक्क्यांची म्हणजे प्रती सदनिका 4 हजार रुपये सवलत मिळणार असून सुमारे 26 हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार राजू पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
केडीएमसीचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे हे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असतांना त्यांनी खोणी पलावा येथील नागरिकांना मालमत्ता करात सवलत दिली होती. त्याचधर्तीवर सवलत द्यावी यासाठी आमदार पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या संदर्भात आमदार पाटील यांनी 20 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिले होते. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. पलावा आयटीपी प्रकल्पामधील नागरिकांच्या मालमत्ता करात 66 टक्के सवलत देण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्याबद्दल आमदार राजू पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .तसेच आतापर्यंत येथील नागरिकांनी मालमत्ता करापोटी भरलेली अधिकची रक्कम आगामी मालमत्ता करात समायोजित करण्यात यावी, अशी मागणी देखील मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -