घरठाणेभाजपाच्या माजी नगरसेवकावर दुसरा गुन्हा दाखल

भाजपाच्या माजी नगरसेवकावर दुसरा गुन्हा दाखल

Subscribe

खंडणी, जबर हल्ला, धमकावण्याचे आरोप

भाजपाचे जोशीबाग येथील माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्याविरुद्ध भूषण जाधव यांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ती तक्रार मागे घेण्यासाठी भूषण यांचा मित्र अमजद अखतर सय्यद यांचे स्टेशन परिसरात असलेली दुकान आणि पतंगाचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप सचिन खेमा यांच्यावर होत आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी जाताना अमजद आणि त्याचा मित्रांवर बुधवारी पहाटेच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने चाॅपरने हल्ला केला. याविषयी तक्रार महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेण्यात आली. माजी नगरसेवक खेमा यासह त्याचा भाऊ अशा सहा जणांविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपाचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांनी भूषण जाधव यांना शिवसेना नेते अरविंद मोरे यांच्याबरोबर फिरत असल्याचा राग अनावर होऊन मारहाण केली होती. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास अमजद सय्यद, मित्र चेतन शेट्टी शहबाज मुलानी हे तिघेजण धमकी आणि खंडणी मागितल्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी जात असताना सत्कार हॉटेल जवळील येथे नितीन खेमा, प्रेम चौधरी, सतेज पोकळ उर्फ बाळा बबलू शेख आणि अन्य एक अनोळखी इसमांनी अमजदवर चॉपरने हल्ला केला. अमजदला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या शहबाज मुलानी याच्या हातावर चॉपरने वार करीत गंभीर दुखापत केली.
अमजदला कल्याणातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भाजपाचा माजी नगरसेवक सचिन खेमा असून त्यांच्या सांगण्यावरून आपसात कट रचून संगनमताने आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची तक्रार महात्मा फुले चौक पोलिसांकडे अमजद यांनी केली आहे.  गुन्हे विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर पी एस पाटील याबाबत तपास करीत आहेत.

- Advertisement -

राजकीय हस्तक्षेपामुळे दोन वेळेस तडीपारी रद्द
भाजपाचे जोशीबाग येथील नगरसेवक असलेले सचिन खेमा यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. दोन वेळेस पोलिसांनी तडीपार करण्याचे आदेश दिले होते मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे तडीपार आदेश पोलिसांना गुंडाळून ठेवावे लागले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -