घरठाणेवाघाचे कातडे विक्रीस आलेल्या दोघांना अटक

वाघाचे कातडे विक्रीस आलेल्या दोघांना अटक

Subscribe

कल्याण क्राईम ब्रांचची कामगिरी

डोंबिवली । वाघाचे कातडे, देशी पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कल्याण क्राईम ब्रांचचे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना खबर मिळाली कि, दोन तस्कर वाघाचे कातडे विक्री करण्यासाठी येणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, विलास कडू आणि विनोद चन्ने यांच्या पथकाने कल्याण-शिळ रोडवरील पिंपळेश्वर येथील क्लासिक हॉटेलच्या पार्किंगमध्ये सापळा रचला. त्यांच्या सोबत कल्याण वन विभागाचे वनपाल राजू शिंदे आणि वनरक्षक महादेव सावंत हे देखील होते.

स्विफ्ट डिझायर कार मधून दोघे जण या ठिकाणी आले. संशयित सीताराम रावण नेरपगार (52) राहणार, चोपडा-जळगाव आणि ब्रिजलाल साईसिंग पावरा (22) राहणार, शिरपूर-धुळे हे संशयास्पद हालचाल करीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची आणि कारची झडती घेण्यात आली असता पट्टेरी वाघाचे कातडे, एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि 2 राऊंड जिवंत काडतूस आढळून आले.वन विभागाच्या अधिकार्‍यांनी ते कातडे वाघ सदृश्य वन्य जनावराचे असल्याचे सांगितले. क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. तसेच वाघाचे कातडे, देशी पिस्तुल, दोन काडतुसे आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा 45 लाख 52 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दोघांना कल्याणच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -