घरठाणेकल्याण-कसारा मार्गावरील स्थानकातील समस्या कधी सुटणार

कल्याण-कसारा मार्गावरील स्थानकातील समस्या कधी सुटणार

Subscribe

रेल्वे प्रवासी संघाचा आंदोलनाचा इशारा

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील स्थानकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या मध्यरेल्वे प्रशासनाच्या विभागीय कार्यालयावर रेल्वे प्रवासी संघटनेने धडक देऊन अधिकार्‍यांना जाब विचारला. गेल्या पंधरा वर्षात आसनगाव आणि कसारा येथे एकही लोकल वाढविण्यात आलेली नसून वारंवार मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन रेल्वे वाहतूक ठप्प होणे, यासह लोकलच्या फेर्‍यांची कमतरता, शटल सर्व्हिस सुरू करणे, आसनगांव स्थानकातील पूर्वेकडील पादचारी पूल, सरकता जिना, संथ गतीने सुरू असलेले लिफ्ट आणि तिसर्‍या मार्गिकेचे काम याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून या कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे प्रवासी संघटनेकडून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मध्यरेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागात जाळे पसरलेल्या या मार्गावरील स्थानकांच्या सोयीसुविधांबाबत रेल्वेचे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. टिटवाळा ते कसारा दरम्यान असणार्‍या खडावली, वासिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, खर्डी, उंबरमाळी, कसारा या स्थानकावरील गैरसोयींमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या स्थानकांवर चाकरमानी प्रवाशांसह गर्भवती महिला, वृद्ध, दिव्यांग व्यक्तींना भेडसावणार्‍या समस्या सातत्याने रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. मात्र कल्याण-कसारा मार्गाबाबत उदासीन धोरण असलेल्या रेल्वे प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेकडून केला जात आहे.

मध्ये रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसोबत संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यामध्ये आसनगांव येथे होम प्लॅटफॉर्मसह स्थानकाच्या पूर्वेला पादचारी पुल, सरकता जिना करणे, लिफ्टच्या कामाचा वेग वाढवणे, शौचालय बांधणे यांसह कसारा स्थानकात सरकता जिना व लिफ्ट बसवणे, खडावली स्थानकात पादचारी पूल, शौचालय दुरुस्ती तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, टिटवाळा स्थानकात सरकता जिना बसविणे, सकाळ, संध्याकाळी गर्दीच्यावेळी ठाणे-आसनगाव- ठाणे शटल सर्व्हिस सुरू करून कसारा मार्गावरील लोकल फेर्‍या वाढविणे तसेच कल्याण-कसारा तिसर्‍या मार्गिकेच्या कामाचा वेग वाढवणे आदी समस्यांचा पाढाच यावेळी मांडण्यात आला. मागील पंधरा वर्षात आसनगाव ते कसारा येथे एकही लोकल वाढविण्यात आलेली नसून वारंवार मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन लोकल उशिराने धावणे त्यामुळे चाकरमानी प्रवाशांना लेटमार्कचा शेरा मिळत आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या गुरवली रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत, जितेंद्र विशे, नंदकुमार देशमुख, लता आरगडे, केतन शहा यांसह विविध रेल्वे प्रवासी संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व मागण्या पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना, कल्याण-कसारा वेल्फेअर असोसिएशन आणि कल्याण, कसारा, कर्जत येथील रेल्वे प्रवासी संघटनेकडून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -