घरमुंबईभाजपने केली शिवसेनेची कोंडी

भाजपने केली शिवसेनेची कोंडी

Subscribe

विकासाचं कल्याण कधी ?

कल्याण पूर्वे मतदार संघावर शिवसेनेचा वरचष्मा आहे. आतापर्यंत शिवसेनेने इथले तीन महापौर दिले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गोपाळ लांडगे यांचा अवघा ७४५ मतांनी पराभव झाला. गणपत गायकवाड हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेने या मतदार संघावर दावा केला आहे. मात्र आमदार गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपात कल्याण पूर्वेवर भाजपने हक्क बजावला आहे. म्हणून शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. समस्यांचे माहेरघर म्हणून कल्याण पूर्वे ओळखला जातो. इथल्या विकासाचा प्रश्न नेहमीच अधांतरी राहिला आहे.

कल्याण पश्चिमेपेक्षा, पूर्वेला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली जाते. सर्व मोठ मोठे प्रोजेक्ट पश्चिमेत साकारले जात आहेत असा आरोप कल्याण पूर्वेतील नागरिकांकडून व लोकप्रतिनिधी यांच्याकडून नेहमीच केला जातो. कल्याण पूर्वेचा परिसर अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग नेवाळीनाका या ग्रामीण भागासह उल्हासनगरमधील पाच प्रभाग असा भाग या मतदार संघात येतो. २००९ ला मतदार संघाचे विभाजन होऊन कल्याण पूर्वेला स्वतंत्र आमदार मिळाला. २००९ आणि २०१४ या दोन्ही टर्म आमदार गायकवाड हे अपक्ष म्हणून निवडून येत आहेत. पहिल्या टर्ममध्ये आघाडीबरोबर आणि दुसर्‍या टर्ममध्ये युतीसोबत राहिले. गायकवाड हे हॅट्रीक साधण्याच्या तयारीत आहेत.

- Advertisement -

मात्र गेल्या दहा वर्षांपासून इथल्या जनतेला रस्त्यावरील खड्डे, अपुरे पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी त्याच त्याच समस्यांचा सामना करावा लागत असल्याने कल्याण पूर्वेतील नागरिक त्रस्त झाले आहेत. काही परिसरात स्लम एरिया असल्याने क्लस्टर अथवा एसआरए योजना राबविण्याची गरज आहे. मात्र गेल्या दहा वर्षात विकासाच्या नावाने बोंबाबोंब दिसून येत आहे. कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या नाराजीचा फटका यंदा आमदार गायकवाड यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढले. त्यावेळी शिवसेनेचे गोपाळ लांडगे आणि गायकवाड यांच्यात कडवी झुंज झाली होती. त्यावेळी लांडगे यांना अवघ्या ७४५ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. भाजपचा उमेदवार हा तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला हेाता. काँग्रेसचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी कल्याण विकासिनीच्या माध्यमातून इथल्या समस्यांना वाचा फोडली आहे. रसाळ हे राष्ट्रवादी अथवा वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळण्याच्या तयारीत आहेत. अन्यथा कल्याण विकासिनीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. शिवसेना व भाजपची युती झाल्यास ही जागा भाजपला जाऊ शकते. मात्र शिवसेनेने या जागेवर प्रखर दावा केला आहे. शिवसेना भाजपची युती न झाल्यास गायकवाड आणि लांडगे यांचा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

२०१४ ची विधानसभेतील मते
गणपत गायकवाड : ३६ हजार ३५७ (अपक्ष)
गोपाळ लांडगे : ३५ हजार ६१२ ( शिवसेना)
विशाल पावशे : २८ हजार ०४ (भाजप)
निलेश शिंदे : १९ हजार ३४६ (राष्ट्रवादी)
नितीन निकम : ७४८५ मनसे

काय आहेत प्रमुख समस्या
अरूंद रस्ते, त्यामुळे होणारी वाहतूक केांडी, अतिक्रमण, बेकायदा बांधकामे ,रस्त्यावरील खड्डे , भरमसाठ वीज बिलांमुळे नागरिक त्रस्त, कचर्‍याची समस्या, अपुरा आणि दुषित पाणीपुरवठा, मैदानाची वानवा, सरकारी हॉस्पिटलची समस्या

आकडेवारी
एकूण मतदार : ३, ४४, ३६९
पुरूष मतदार : १, ८६ , ८१८
महिला मतदार : १, ५७, ३८६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -