घरमुंबईकल्याण ग्रामीण शिवसेनेत चाललंय तरी काय ?

कल्याण ग्रामीण शिवसेनेत चाललंय तरी काय ?

Subscribe

सुभाष भोईरांचा पत्ता कट? रमेश म्हात्रेंना उमेदवारी

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना एबी फॉर्म देण्यात आला असून तेच अधिकृत उमेदवार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर दिली. त्यामुळे भोईरांचा पत्ता कट झाला असून, शुक्रवारी म्हात्रे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भोईर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, सेनेत चाललयं तरी काय? असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

शिवसेनेने आमदार सुभाष भोईर यांना मातोश्रीवरून एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांनी 1 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी विरोध दर्शवित राजीनामे सादर केले होते. भोईरांना उमेदवारी दिल्यास काम करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रमेश म्हात्रे यांच्यासोबत निवडणूक कार्यालयाला भेट दिली. मातोश्रीवरून कल्याण ग्रामीणचा उमेदवार बदलण्यात आला असून रमेश म्हात्रे हेच अधिकृत उमेदवार असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली. त्यामुळे शिवसैनिक संभ्रमित झाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान या सगळया घडामोडी घडत असतानाच आमदार भोईर यांच्या समर्थनार्थ महायुतीतील सेना, भाजप, रिपाई या घटक पक्षांच्या नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी एक पत्रकार परिषद घेतली. पक्षाने सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिल्याने आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी रमेश म्हात्रेंबाबत केलेल्या घोषणेची कोणतीही माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराबाबत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असल्याने आणखी काही घडामोडी घडतात का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -