घरमहाराष्ट्रशेकापसाठी पेणचा पेपर अवघड

शेकापसाठी पेणचा पेपर अवघड

Subscribe

पेण-नागोठणे-सुधागड विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षासाठी अनेकदा ‘लकी’ ठरलेला असल्याने यावेळी पुन्हा एकदा हा पक्ष पुन्हा एकदा विजयासाठी आतूर असून, तशी तयारीही सुरू झाली आहे. मात्र या मतदारसंघाचा पेपर सोडविणे पक्षाला काहीसे अवघड जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे आमदारकीची हॅटट्रिक करायला निघालेल्या विद्यमान आमदरांना अडथळ्यांची शर्यत पार करताना दमछाक सहन करावी लागेल.

पेण विधानसभा मतदारसंघावर 1990 पासून ते 2004 पर्यंत शेकापने वर्चस्व ठेवले होते. 2004 साली शेकापचा पराभव करून काँग्रेसने बाजी मारली. यांनतर 2009 ते 2019 पर्यंत शेकापने पुन्हा आपले वचर्स्व कायम ठेवले आहे. परंतु यावेळी या मतदारसंघात भाजप-शिवसेना (युती झाली तर) विरुद्ध शेकाप-राष्ट्रवादी आघाडी अशी तुल्यबळ लढत होऊ शकते. पेण विधानसभा मतदारसंघात पेण व सुधागडसह रोहे तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. राज्यात गाजलेल्या पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणानंतर इथली राजकीय समीकरणेही बदलत गेली आहेत. 2014 च्या निवडणुकीत शेकापचे धैर्यशील पाटील विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार व मंत्री रवी पाटील, शिवसेनेचे किशोर जैन यांच्या विरोधात लढत दिली होती. या तिरंगी लढतीमध्ये धैर्यशील पाटील 64 हजार 616, रवी पाटील 60 हजार 494, तर जैन यांना 44 हजार 257 मते मिळाली होती.

- Advertisement -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला पेणमधून 89 हजार, तर आघाडीच्या उमेदवाराला 88 हजार मते मिळाली होती. त्यामुळे आघाडीला हुरूप येणे स्वाभाविक आहे. मात्र बदलत्या राजकारणात काँगे्रसचे रवी पाटील यांनी कमळ हाती घेतले. या मतदारसंघात भाजपची फारशी ताकद नसताना पाटील यांचा प्रवेश त्या पक्षासाठी संजीवनी देणारा ठरला आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असून, त्यांच्याबरोबर अनेक काँग्रेस कार्यकर्तेही भाजपवासी झाले आहेत. पाटील यांची सर्वसमावेशक प्रतिमा पाहता भाजपकडून त्यांना पुढे केले जाणार यात शंका नाही, किंबहुना यावेळी पेण मतदारसंघात युतीकडून सेनेचा नाही तर भाजपचाच उमेदवार असणार, अशी वातावरण निर्मिती केली गेली आहे.या मतदारसंघात आगरी, मराठा आणि आदिवासी मतदार बहुसंख्येने आहेत. रायगड जिल्ह्यात युतीच्या उमेदवारांची अदलाबदल होणारे जे काही संभाव्य मतदारसंघ आहेत त्यात पेणचा समावेश असू शकतो. शिवसेना नेते येथील उमेदवार ठरविताना आपल्या उमेदवारासाठी आग्रह धरणार नाहीत असे सध्याचे तरी चित्र आहे. परंतु स्थानिक कार्यकर्ते इरेला पडलेच तर सेना नेत्यांपुढे धर्मसंकट उभे राहू शकते. मतदारसंघातील अनेक प्रश्न, उदा. पाणी, रोजगार, आरोग्य, विद्यमान आमदारांसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. काँगे्रसचे कार्यकर्ते धैर्यशील पाटील यांना मनापासून साथ देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे युती झालीच तर शेकाप आघाडीला ही निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाही, असे बोलले जात आहे. शेकापत वारंवार एकच उमेदवार दिला जात असल्यानेही कार्यकर्ते खासगीत नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे या निवडणुकीचा पेपर धैर्यशील पाटील कसा सोडवितात, याची उत्सुकता सर्वांनाच राहणार आहे. दोन पाटलांत लढत झाली तरच ती लक्षवेधक ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -