घरमुंबईपालघरचा गड सर करण्यासाठी शिवसेना विरुद्ध ठाकूर युद्ध

पालघरचा गड सर करण्यासाठी शिवसेना विरुद्ध ठाकूर युद्ध

Subscribe

लोकसभेची जागा हट्टाने पदरात पाडून शिवसेनेने पालघर जिल्हा काबिज करायला सुरुवात केली आहे. त्यासाठीच आता जिल्ह्यातील विधानसभेच्या सहापैकी चार जागा शिवसेनेने जवळपास पदरात पाडून घेतल्या आहेत. तर आपल्या तीन जागा राखण्यासाठी बविआने कंबर कसली आहे. त्यामुळे जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना विरुद्ध हितेंद्र ठाकूर असा थेट सामना रंगतदार होणार आहे.

पालघर जिल्ह्यात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड, डहाणू या विधानसभेच्या सहा जागा आहेत. त्यापैकी वसई, नालासोपारा, बोईसर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. पालघर शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर विक्रमगड आणि डहाणू भाजपकडे आहे. लोकसभा निवडणुकीनंतर याठिकाणची समीकरणे आता बदलायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघ हट्टाने मागून घेतला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांना सेनेच्या पदरात टाकले. गावीत यांच्या रुपाने पालघरच्या खासदार निवडून आणण्याचे गेल्या काही वर्षांपासून सेनेचे स्वप्न पूर्ण झाले.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीतील निकालाने सेनेच्या आशा पल्लवीत झाल्या. नालासोपारा आणि बोईसर या ठाकूरांच्या बालेकिल्ल्यात सेनेला जोरदार आघाडी मिळाली. तर वसईत ठाकूरांना दहा हजाराच्या आघाडीत रोखण्यात सेनेला यश मिळाले. त्यानंतर सेनेने जिल्हा आपल्या ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या. बविआचे बोईसरचे आमदार विलास तरे यांना सेनेने शिवबंधन बांधले. माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना शिवबंधन बांधून नालासोपार्‍याचे उमेदवार म्हणून पुढे आणले. काँग्रेसचे राज्य सचिव विजय पाटील यांना शिवबंधन बांधून त्यांना वसईचे उमेदवार म्हणून मान्यता दिली. पालघर विधानसभेसोबतच शिवसेनेने आता वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

युतीची अद्याप घोषणा झालेली नाही. उमेदवारही निश्चित झालेले नाहीत. असे असतानाही पालघरमध्ये मात्र शिवसेनेकडून वसई, नालासोपारा, बोईसर आणि पालघरमध्ये उमेदवारी मिळालीच यादृष्टीने मोर्चेंबाधणी केली जात आहे. वसई विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत ठाकूरांनी शिवसेना पुरस्कृत आमदार विवेक पंडित यांचा पराभव केला होता. यावेळी पंडित पुन्हा इच्छुक आहेत. मात्र, शिवसेनेतूनच त्यांना विरोध केला जात आहे. त्यातच सेनेच्या नेत्यांनी काँग्रेसचे सचिव विजय पाटील यांना शिवबंधन बांधून उमेदवारीचा शब्द दिला आहे. पाटील यांनी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांपासून वसईत मोर्चेबांधणी केली आहे. बविआकडून अद्याप कोण निवडणूक लढवणार याचे नाव गुपित ठेवण्यात आले आहे. हितेंद्र ठाकूर येथील आमदार असले तरी नालासोपार्‍यात प्रदीप शर्मांंची ताकद आजमवल्यानंतरच याठिकाणी बविआच्या उमेदवाराचे नाव आयत्यावेळी जाहिर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एका कार्यक्रमात वसईतून सुशिक्षित आमदार देऊ असा उल्लेख करून अप्रत्यक्षरित्या याठिकाणी उमेदवार बदलला जाईल असेच सुचित केले आहे. वसई मतदारसंघ सध्यातरी बविआला सोपा असाच आहे.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यात खरी लढत नालासोपार्‍यात पहावयास मिळणार आहे. प्रदीप शर्मा यांनी रविवारपासून नालासोपार्‍यात थेट प्रचारालाच सुरुवात केलेली आहे. बविआचे क्षितीज ठाकूर गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत सेना-भाजप वेगवेगळे लढले असतानाही ठाकूरांच्या मतात घट झाली होती. इतकेच नाही तर लोकसभा निवडणुकीतही बविआला नालासोपार्‍यातून 26 हजार मतांची पिछाडी होती. त्यातच आता सेनेने प्रदीप शर्मा यांना मैदानात उतरवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे याठिकाणी बविआची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शर्मा यांचे आव्हान लक्षात घेऊनच नालासोपार्‍यात उमेदवार देण्याबाबत बविआ निर्णय घेईल असे दिसते. क्षितीज ठाकूर यांना वसईत पाठवून स्वतः हितेंद्र ठाकूर शर्मांना सामोरे जातील अशीही चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी काँटेकी टक्कर होऊन कोण बाजी मारील याबाबत आताच बोलणे सगळ्यांसाठी अवघड होऊन बसले आहे.

लोकसभा निवडणुकीत बविआला बोईसरमधून 38 हजार मतांची पिछाडी होती. त्यामुळे बविआचे आमदार विलास तरेंच्या अडचणी वाढल्या होत्या. शेवटी तरेंनी बविआला रामराम ठोकत थेट सेनेत प्रवेश केला. तरेंनी सेनेत प्रवेश केल्याने बविआला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेकडून विलास तरे यांची उमेदवारी निश्चित आहे. बविआची मात्र याठिकाणी कोंडी झाली आहे. तरेंच्या तोडीला उमेदवार नसल्याने बाहेरून उमेदवार आयात करण्याचा बविआचा प्रयत्न आहे. बोईसरमध्ये बविआ कमकुवत असल्याने सेनेला याठिकाणी विजय मिळवणे सध्यातरी सोपे दिसत आहे. पालघरमध्ये अमित घोडा शिवसेनेचे आमदार आहेत. यावेळी त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पालघरमधून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे. डॉ. विश्वास वळवी यांनीही मोर्चेबांधणी सुुरु केली आहे. बविआकडून माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांना उतरवले जाण्याची शक्यता आहे. पालघर सेनेचा बोलेकिल्ला आहे. काँग्रेसमधून मनोहर दांडेकर आणि मनोज दांडेकर इच्छुक आहेत. विरोधकांकडे अद्यापतरी तोडीचा उमेदवार दिसत नाही.

डहाणू आणि विक्रमगडमध्ये भाजपाचे आमदार आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात युतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांना फटका बसला आहे. यादोन्ही ठिकाणी सीपीएमचा प्रभाव आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच बविआचे बळीराम जाधव यांना आघाडी मिळवणे शक्य झाले होते. डहाणूतून पिछाडी मिळाली असली तरी भाजपाकडून विद्यमान आमदार पास्कल धनारे यांना पुन्हा मैदानात उतरवण्यात येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून ही जागा सीपीएमला दिली जाणार आहे. त्यांच्याकडून उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. विक्रमगडमधून निवडून आलेले माजी पालकमंत्री विष्णू सवरा निवृत्तीच्या मार्गावर आहेत. आदिवासी विकास आणि पालकमंत्री असताना सवरा यांच्याकडून विशेष कामगिरी न झाल्याने त्यांना मंत्रीपदावरून डच्चू दिला गेला होता. सवरा यांनी पुत्र डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले यांच्या नावाचीही चर्चा आहे. महाआघाडीकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा मैदानात उतरणार आहेत.

एकंदरीत पालघर जिल्ह्यात युती विरुद्ध महाआघाडी अशीच लढत होईल. युतीत वसई, नालासोपारा, बोईसर आणि पालघरची जागा सेनेकडे जाईल. तर महाआघाडीत वसई, नालासोपारा, बोईसर या जागा बविआला मिळतील. पालघर काँग्रेसला मिळेल. विक्रमगड राष्ट्रवादी आणि डहाणू सीपीएमच्या वाट्याला जाईल. असे असले तरी पालघरचा गड जिंकण्यासाठी खरी लढत युती विरुद्ध बविआ अशीच होणार आहे. यावेळी मात्र बविआला वाटते तितके सोपे नाही.

पालघरचा गड सर करण्यासाठी शिवसेना विरुद्ध ठाकूर युद्ध
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -