आरे मेट्रो कारशेड; दीड वर्षे बॅकफुटला

मेट्रोच्या कारशेडवरून भरपावसाळ्यात आरेचे जंगल चांगलेच पेटले आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील जागा योग्य आहे. यावर सरकार व एमएमआरडीए प्राधिकरण ठाम आहे. मात्र मुंबईतील विविध पर्यावरणवादी संस्था व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे व काँग्रेस, राष्ट्रवादीकडून कारशेडला विरोध केला आहे. सरकारविरोधात पर्यावरणवादी संघटना व सर्वच राजकीय पक्ष असे चित्र निर्माण झाले आहे. आरेला होत असलेल्या विरोधाची कारणे व मेट्रो प्रकल्पाबाबत सरकारची भूमिका याबाबत ‘आपलं महानगर’ने घेतलेला आढावा

मेट्रो ३ आरे कारशेडसाठी मुंबई महापालिकेने अखेर २१८५ वृक्ष कापण्यासाठीची परवानगी दिली आहे. त्यासोबतच ४६१ वृक्षांच्या पुनर्रोपणाला महापालिकेने परवानगी दिली आहे, पण या सगळ्या परवानग्यांच्या आणि न्यायालयीन याचिकांच्या फेर्‍यात मेट्रो ३ कारशेडच्या कामात सुमारे दीड वर्षाचा कालावधी याआधीच निघून गेला आहे. आगामी २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात मेट्रो ३ च्या डब्यांचे आगमन अपेक्षित आहे, पण अद्यापही हे मेट्रोचे डबे ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. प्रकल्पाचे काम एका दिवसाने रखडले तरीही मेट्रोचे ४.२३ कोटी रुपये इतके नुकसान होईल.

मेट्रो ३ कारशेडला विरोध आणि पाठिंबा असा दुहेरी गट सध्या मुंबईत उभा ठाकला आहे. शिवसेनेच्या विरोधानंतरही मुंबई महापालिकेत आरे कारशेडच्या जागेसाठी वृक्ष कापण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता शिवसेनेनेही कारशेडच्या वृक्ष कापण्याचा वाद उच्च न्यायालयात मांडला आहे. मुंबई महापालिकेकडून यासाठी परवानगी मिळाली असली तरीही आता हा वाद न्याय प्रविष्ठ असल्याने प्रकल्पाचे काम मात्र प्रत्यक्ष सुरू होऊ शकणार नाही. न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रोची एक ट्रेन ही जवळपास ८ डब्यांची आहे. अशा एकूण ३१ ट्रेन मेट्रो ३ प्रकल्पासाठी दाखल होणार आहेत. डिसेंबरमध्ये एका आठवड्याने एक ट्रेन येईल असे वेळापत्रक एमएमआरसीने तयार केले आहे. ऑक्टोबर २०२० पर्यंत कारशेड होणे गरजेचे आहे. अन्यथा मेट्रो ट्रेन आणणे शक्य होणार नाही. मेट्रो ट्रेन दाखल झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मार्गाचे टेस्टिंग आणि कमिशनिंग करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणे अपेक्षित आहे. कारशेड डेपो तयार होण्यासाठी.

मेट्रो ३ ही २०२१ मध्ये संपूर्ण क्षमतेने कार्यरत होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत कारशेड डेपोच्या उभारणीला आधीच विरोध झाल्याने काही विलंब होणे अपेक्षित आहे, पण पावसाळ्यानंतर वृक्ष छटाईचे काम सुरू झाल्यावर मात्र ऑक्टोबरपर्यंत कारशेडचे काम पूर्ण करण्याचे एमएमआरसीचे उदिष्ट आहे. त्यानंतरच मेट्रोच्या डब्यांना मुंबईत आणणे शक्य होईल. आगामी काळात कोणत्याही न्यायालयीन याचिका जर झाल्या नाही तसेच कोर्टाकडून कामासाठी परवानगी मिळाली तरच हे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करता येतील, असा विश्वास एमएमआरसीच्या अधिकार्‍यांना वाटतो.

काँग्रेसकडून वृक्ष पूजनाचा कार्यक्रम
मुंबई काँग्रेसतर्फे रविवारी आरेमध्ये वृक्ष पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे मुंबई माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हस्ते आरे कारशेड जवळील वृक्षाचे पूजन करण्यात आले. तसंच, शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी आमदार उपस्थित होते. शिवसेना आरेबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मोठ्या प्रमाणात झाडे कापण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

या प्रस्तावानुसार, २ हजार ७०० झाडे कापली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह प्रत्येकाला असे वाटते की, आरेतील झाडे कापता कामा नये. कारण, आरे कॉलनीतील झाडे म्हणजे मुंबईकरांचा श्वास आहे. त्यामुळे, मुंबई काँग्रेसला जोडून असणारे अनेक पक्ष इथे दाखल झाले होते. मेट्रोच्या विरोधात कोणताच पक्ष काम करत नसेल, पण झाडे कापून मेट्रो तयार करणे चुकीचे असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले.

फॅक्ट लिस्ट – कांजुरमार्ग
=कांजुरमार्गच्या जागेसाठीची मागणी एमएमआरसीमार्फत २०१५ पासून झाली होती.
=पण कांजुरमार्गची जागा कारशेडसाठी उपलब्ध झाली नाही.
=प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानेच कारशेडची जागा निश्चित होणे गरजेचे होते.
=डिसेंबर २०१६ मध्ये राज्य सरकारने आरेच्या जागेची निवड कारशेडसाठी निश्चित केली.

प्रकल्पाची सद्यस्थिती
=एकूण ६१ टक्के भुयारीकरण
=एकूण ४० टक्के स्थानकांचे काम
=एकूण गुंतवणूक ११,१९८.३३ कोटी

एमएमआरसीचे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन
=लावण्यात आलेली एकूण झाडे २३८४६
=संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लावलेली झाडे २०९००
=मुंबईच्या इतरत्र भागात लावण्यात आलेली झाडे २९४६
=बांधकाम पूर्ण झाल्यावर लावण्यात येणारी झाडे ३०००
=वाटप करण्यात आलेली रोपटी २५ हजार

आरेसाठी स्थानिकही एकवटले!
मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील जवळपास २ हजार ७०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव नुकताच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांसह अनेक राजकीय पक्ष एकवटले आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा रविवारी आरे कॉलनीत आला. रविवारी सकाळपासून पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवत मेट्रो प्रकल्पाविरोधातील घोषणाबाजी केल्या. आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी रस्त्यावर मानवी साखळी तयार केली. तसेच पर्यावरण प्रेमीनी कारशेड जवळील एका झाडाला रिंगण घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध नोंदवला.

जैवविविधतेचा नाश होईल
आरेच्या जंगलात सुमारे ७७ प्रजातीचे पक्षी, ८६ प्रजातीची फुलपाखरे, अनेक प्रजातीचे किटक, ९ बिबटे, १३ प्रजातीचे उभयचर प्राणी, ४६ प्रजातीचे सरपटणारे प्राणी, अनेक जुन्या प्रजातीचे वृक्ष व वनस्पती आहेत. तरी मेट्रोसाठी वृक्षतोड केल्यास तेथील जैवविविधतेचा नाश होईल. त्यामुळे आरे वसाहतीतील वृक्षतोड करण्यात येऊ नये अशी सूचना पर्यावरणप्रेमी संस्थांकडून होत आहे.

आरेमध्ये देशी झाडे लावा
आरे कारशेडच्या जागेत सुमारे १२०० झाडे विदेशी प्रजातीची आहेत. त्याऐवजी स्थानिक पर्यावरणास अनुकूल अशी देशी प्रजातीची झाडे लावण्यात यावी तसेच किमान १० ते १२ फूट उंचीची व वेगाने वाढणारी आणि २० वर्षांनीसुध्दा पुनर्रोपित करता येतील,अशी झाडे लावण्यात यावीत, अशी सूचना वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी केली.

मेट्रो कारशेडसाठी या जागांचाही झाला अभ्यास
पर्यायी जागा म्हणून आतापर्यंत मेट्रो कारशेडसाठी कलिना विद्यापीठ, महालक्ष्मी रेसकोर्स आणि वांद्रे कुर्ला संकुल या जागांचा विचार करण्यात आला होता. मात्र, तिन्ही ठिकाणी असणारी आव्हाने ही वेगवेगळी आहेत. त्यामुळेच आरे कारशेडची जागा ही सगळ्यात उजवी ठरली आहे. कलिना विद्यापिठात विस्तारीकरणाची योजना असल्यानेच त्याठिकाणचा पर्याय बारगळला, तर महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचाही सविस्तर अभ्यास झाला होता. याठिकाणी भूमिगत मेट्रो कारशेड डेपो तयार करता येतो का? असा विचार करण्यात आला होता, पण २४ तास वातानुकूलित यंत्रणेचा वापर करावा लागेल हे स्पष्ट झाल्यानेच पर्यावरणीयदृष्ठ्या हा पर्याय बारगळला. त्यामुळेच आरेचा पर्याय हा सोप्या प्रवेशाच्या अनुषंगाने सुलभ आहे. म्हणूनच आरेच्या जागेची निवड कारशेडची जागा म्हणून करण्यात आली.

कारशेड डिझाईनचे आव्हान
मेट्रोचा कारडेपो हा मंजूर झालेल्या ३० हेक्टर जागेपैकी २५ हेक्टर जागेवर येणार आहे. मुंबई मेट्रोच्या एकूण ३१ ट्रेन ठेवण्यासाठी २५ हेक्टर जागेत कारशेड डेपोची डिझाईन करणे हे मोठे आव्हान आहे. कारशेडसाठी जागेच्या चणचणीमुळे काही स्टॅबलिंग लाईन्स काही स्टेशन नजीकच्या परिसरातच तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळेच वांद्रे कुर्ला संकुल तसेच कफ परेड या स्थानकाच्या परिसरात प्रत्येकी दोन ट्रेन ठेवण्याचे एमएमआरसीकडून ठरवण्यात आले आहे.

शिवसेनेची दुटप्पी भूमिका
शिवसेनेत महानगरपालिकेत सत्तेत असताना त्यांच्यानुसारच हा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. एकीकडे कारशेड प्रस्तावित केला जातो आणि त्यानंतर मुंबईकरांच्या रागाला सामोरं जावं लागेल या भीतीने वृक्ष कापण्याच्या विरोधात असल्याचं दुसरीकडे सांगतात. त्यामुळे जर शिवसेना वृक्ष तोडीच्या विरोधात असेल तर सरकारमधून हा प्रस्ताव मागे घेण्यात यावा. त्यासोबतच जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रस्ताव रद्द करत नाही तोपर्यंत येणारी निवडणूक एकत्र लढणार नाही असं जाहीर करावे, असा ही सल्ला संजय निरुपम यांनी दिला आहे.

कारशेडचे काम सुरू होणार
मेट्रो कारशेडच्या कामासाठी २.५ टक्के म्हणजे म्हणजेच ३० टक्के हेक्टर जमीन कारशेडसाठी आवश्यक आहे. ३० हेक्टरपैकी ८३ टक्के जमीन वृक्षाच्छादित नाही. मेट्रोच्या कामामुळे एकूण २६४६ वृक्ष बाधित होणार आहेत. एकूण २१८५ झाडे तोडण्यात येतील, तर ४६१ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. आता वृक्ष प्राधिकरणाकडून मिळालेल्या परवानगीनुसार आगामी ३० दिवसांच्या कालावधीत १३,११० नवीन वृक्ष लागवडीचे लक्ष मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यात आले आहे. न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यावर प्रत्यक्ष कारशेडच्या ठिकाणी काम सुरू होण्यासाठीची सुरुवात होईल. मेट्रोचे डबे नोव्हेंबर २०२० पर्यंत दाखल होणार आहेत. त्याआधीच मेट्रो कारशेडचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत संपूर्ण मेट्रो ३ साठीचे कारशेड उभारणीचे काम पूर्ण करण्याची मोठी कसरत एमएमआरसीला करावी लागणार आहे.

आरे जंगल नाही म्हणणार्‍यांच्या बंगल्यात बिबटे, विंचू, साप सोडा-शर्मिला ठाकरे
कारशेडविरोधात रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आरे जंगल नाही म्हणणार्‍यांच्या बंगल्यात बिबटे, विंचू, साप सोडा असे आवाहन राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केले. मी स्वतः पर्यावरणप्रेमी आहे. मला अस्थमा आहे. मला शुद्ध हवा ऑक्सिजनचे महत्व माहीत आहे. किडवाई नगरमध्ये सरकारने झाडे लावली, पण प्रत्यक्षात तेथे कोणतेही झाड अस्तित्वात नाही. मुंबईतील प्रत्येकाने हाच विचार करायचा आहे की आम्हाला मुंबईत मोकळा श्वास घायचा आहे. हे सरकार सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या आदेशालाही घाबरत नाही. आरेच्या जंगलातील मेट्रो स्टेशनला आमचा विरोध आहे. यासाठी सरकारने अन्य जागेचा विचार करावा, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

बाधित झाडांवर स्पष्ट नोटीस लावणे बंधनकारक असतानाही एकाही झाडावर नोटीस लावलेली नाही. झाडांना हानी पोहचावी यासाठी मेट्रो डेपोच्या परिसरातील शेकडो झाडांवर मोठ्या प्रमाणात चिखल व कचर्‍याचा ढिगारा टाकण्यात आला आहे. अशाप्रकारे अनधिकृत कृत्य एमएमआरसीएलमार्फत केले जात आहे. त्यामुळे मेट्रो प्राधिकरणाविरोधात त्वरित कारवाई करण्यात यावी. आरे वसाहतीतील प्रस्तावित कारशेडचे ठिकाण हे अनेक सस्तन, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, किटक,दुर्मीळ प्रजातींचे वृक्ष व वनस्पती यांचे माहेरघर आहे. त्यामुळे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅक्ट १९७२ अंतर्गत त्यांचे संरक्षण केले जाते. अशा नैसर्गिक निवासाचा नाश करणे हे वन्यजीवन कायद्यांतर्गत प्रतिबंधित आहे.
– झोरु भतेना, तक्रारदार, पर्यावरणवादी.

आरे जंगलातील झाडे 1950 पूर्वीची आहेत. म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी आमच्या पूर्वजांनी ही झाडे लावलेली आहेत. आम्हा आदिवासींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंगहालय नको वा पेंग्वीन नको. आमचा जीव गेला तरी आम्ही जागा देणार नाही.
– लक्ष्मण दळवी, आदिवासी समूहाचे प्रतिनिधी

आरेमध्ये २७ आदिवासी पाडे आहेत. आदिवासी पाड्यात एसआरए लागू होत नाही. आदिवासी असेल तर माणुसकी राहील. ब्रिटिश आम्हाला एनीमिस्ट संबोधायचे, आम्हाला त्याचा गर्व आहे. मेट्रो आणून आदिवासींचा विकास संपवत आहेत. त्यामुळे आरेतील मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध आहे.
– रवींद्र, आदिवासी समूहाचे प्रतिनिधी

मेट्ो प्रकल्पासाठी माझी १५ झाडे कापली. बाभूळ, फणस, चिकू, जांभूळ आदी फळझाडे कापली. या झाडांवरच आपले आर्थिक उत्पन्न होते. आदिवासींचा उदरनिर्वाह या झाडांवर चालतो. ही झाडे आम्ही मुलांसारखी सांभाळली. लहान मुलांसारखी जपली. आरे वसाहतीची जागा आम्ही जपून ठेवली. ही जागा आम्हा आदिवासींची आहे, तुमची नाही.
– आशाताई, आदिवासी महिला

मी आरेतील खंबातापाडा येथे राहते. आमच्या शेतीमध्ये वाघ, साप, जंगली प्राणी आहेत. तेथील प्राण्यांची आम्हाला सवय झालेली आहे. तसेच तेथील प्राण्यांनाही आमची सवय झालेली आहे. आरे वसाहतीतील जंगल कमी करण्यात येऊ नये.
– वनिता ठाकरे, आदिवासी महिला

(संकलन-किरण कारंडे, सचिन धानजी, भाग्यश्री भुवड मांडणी)