घरमुंबईमातोश्रीच्या अंगणात का हरले मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर?

मातोश्रीच्या अंगणात का हरले मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर?

Subscribe

महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचा शिवसेनेचा बालेकिल्ला अर्थात मातोश्रीच्या अंगणातच वांद्रे पूर्वमध्ये दारूण पराभव झाला आहे. आता त्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

मुंबईतील वांद्रे पूर्व मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना बंडखोरीचा फटका बसला असून विधानसभेत जाण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले. तृप्ती सावंत यांचे आव्हान गांभीर्याने न घेतल्यानेच तसेच भाजपच्या नाराजीचा फटका महापौरांना बसल्याचा निष्कर्ष आता काढला जात आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात २००९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार म्हणून प्रकाश (बाळा) सावंत हे निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर २०१५मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केला. परंतु या पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेने २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सावंत यांना पुन्हा संधी देण्याऐवजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. त्यामुळेच तृप्ती सावंत यांनी बंडखोरीचा नारा देत वेगळा सुभा उभा केला.


हेही वाचा – हे निकाल म्हणजे सत्ताधाऱ्यांना धडा-उद्धव ठाकरे

काँग्रेसने या मतदारसंघातून माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान यांना उमेदवारी दिली. परंतु शिवसेनेची भाजपसोबत युती असूनही महापौरांच्या प्रचारात भाजपच्या पदाधिकार्‍यांचा सक्रीय सहभाग दिसत नव्हता. आधीच तृप्ती सावंत यांचे आव्हान असताना दुसरीकडे भाजपशी समन्वय राखण्यात महापौरांना आलेले अपयश हेच त्यांच्या पराभवाचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

तृप्ती सावंत यांचा तुफान प्रचार

२०१५च्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत केवळ सहानभूतीच्या लाटेवर निवडून आल्या. परंतु त्यांच्या मागे जनाधार नाही. त्यामुळेच सावंत यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा विषय हसण्यावरी नेण्याचा प्रयत्न केला गेला. पण परिस्थिती माणसाला जगायला शिकवते म्हणतात. त्याप्रमाणे प्रचाराच्या दहा दिवसांमध्ये सावंत यांनी तुफान प्रचार केला आणि बाळा सावंत यांचेच कार्ड वापरुन पुन्हा एकदा सहानभूतीची मते सावंत यांनी पारड्यात पाडून घेतली. सावंत यांनी मनसेच्या अखिल चित्रे यांच्यापेक्षा अधिक म्हणजेच तिसर्‍या क्रमांकाची २४ हजार मते मिळवली. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर ३२ हजार ५४७ मते मिळवत दुसर्‍या क्रमांकावर राहिले. पहिल्या क्रमांकाची ३८ हजार ३३७ मते मिळवत दोघांनाही पराभवाचं पाणी पाजून झिशान सिद्दिकी यांनी अनपेक्षित विजय मिळवला.


हेही वाचा – आज हरलो आहे पण थांबलो नाही-उदयनराजे भोसले

महाडेश्वरांची ही संधी हुकली!

मनसेचे अखिल चित्रे यांनी मोठ्या प्रमाणात मिळवलेली मते आणि बाळा सावंत यांच्या नावावर सहानुभूतीची मागितलेली मते, तसेच भाजपशी नसलेला समन्वय यामुळेच महाडेश्वर यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. मातोश्रीच्या अंगणात महाडेश्वर यांचा झालेला हा पराभव शिवसेना प्रवक्ते आणि विभागप्रमुख अनिल परब यांच्या संघटन कौशल्याच्या अभावामुळेही झाल्याचे बोलले जाते. महापौरांचा विजय झाला असता तर छगन भुजबळ यांच्यानंतर महापौर असताना आमदार बनण्याचा मान महाडेश्वरांना मिळाला असता. परंतु महापौर असताना आमदार बनण्याची संधी त्यांची या पराभवाने हुकली.

- Advertisement -

पराभवाची पाच प्रमुख कारणे

१. विद्यमान आमदार तृप्ती सावंतांचं कापलेलं तिकीट
२. पक्षातून निलंबित केल्याने सावंत यांना वाढलेली सहानभूती
३. सहानुभूती आणि बाळा सावंत यांच्यावरील प्रेमापोटी तृप्ती सावंत यांना झालेले मतदान
४. मनसेचे अखिल चित्रे यांनी मिळवलेली मतं
५. विभागात महापौरांविरोधातील वातावरण
६. भाजपसोबत महापौरांसह शिवसेनेचा नसलेला समन्वय
७. एमआयएमच्या उमेदवाराला अपेक्षित मतदान न होणे. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांच्या मतांचं विभाजन टळलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -